पोलीस खात्याला लोकायुक्तांचा दणका

0
123

>> विमल गुप्ता लाच प्रकरणाची स्वेच्छा दखल

गोवा लोकायुक्तांनी माजी पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्या कथित लाच प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणी गृहखात्याला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
माजी पोलीस महासंचालक सुनील गर्ग यांच्याविरोधात कथित लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा जिल्हा न्यायालयाने सोमवारी आदेश देऊन पोलीस खात्याला पहिला दणका दिला होता. त्यानंतर लोकायुक्तांनी पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्या कथित लाच प्रकरणाची दखल घेऊन पोलीस खात्याला दुसरा दणका दिला आहे.

पोलीस खात्यातील उपनिरीक्षक देवयानी आंबेकर यांची खातेनिहाय चौकशीतून सुटका करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. या कथित लाच प्रकरणी उपनिरीक्षक देवयानी आंबेकर, पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर सरकारने एका आदेशान्वये पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांना दिल्ली येथे गृहमंत्रालयाकडे परत पाठवणी केली आहे.

पोलीस खात्याने उपनिरीक्षक आंबेकर आणि एका शिपायाला या प्रकरणी निलंबित केले. तथापि, पोलीस पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर लाच प्रकरण चर्चेचा विषय बनलेला आहे. लोकायुक्तांनी या लाच प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पोलीस खात्यातील आणखी एक आयपीएस अधिकारी चौकशीच्या घेर्‍यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका विदेशी नागरिकाने आपल्या वकालतीकडे या आयपीएस अधिकार्‍याच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे. गोवा पोलीस खात्याकडे सदर तक्रार चौकशीसाठी आली होती. या तक्रारीची चौकशी कथित लाच प्रकरणातील पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांनी केली आहे. सदर आयपीएस अधिकार्‍याला क्लीन चीट देण्यात आलेली आहे.