
>> दक्षिण आफ्रिकेची मालिकेत आघाडी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ७२ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना भारताची बलाढ्य फलंदाजी १३५ धावांवर ढेपाळली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करण्याची तसदी घेतली नाही. तळातील रविचंद्रन अश्विनने ३७ धावा जमवल्याने भारताच्या पराभवाचे अंतर कमी झाले. कर्णधार विराट कोहलीने २८ धावा केल्या. पंड्या, पुजारा, साहा यांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणेला वगळून संघात स्थान दिलेल्या रोहित शर्माला दहा धावांपलीकडे मजल मारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव झटपट गुंडाळणार्या गोलंदाजांची मेहनत वाया घालविण्याचे काम फलंदाजांनी केले.
दक्षिण आफ्रिकेकडून फिलेंडरने बळींचा षटकार मारला, तर रबाडा आणि मॉर्कलने प्रत्येकी २ बळी घेतले. या त्रिकुटाने जायबंदी डेल स्टेनची अनुपस्थिती जाणवू दिली नाही.
तत्पूर्वी, चौथ्या दिवशी भारताच्या धारधार गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावांवर कोसळला होता. तिसर्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर चौथ्या दिवशी आफ्रिकेने दुसरा डाव २ बाद ६५ धावांवरून पुढे सुरू केला. मोहम्मद शामीच्या वेगवान मार्यापुढे आमला (४) आणि रबाडा (५) धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार ड्युप्लेसिसला बुमराहने शून्यावर बाद केले. ड्युप्लेसिस बाद झाला तेव्हा यजमानांचा निम्मा संघ ८२ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर पंड्या, भुवीच्या शानदार गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा डाव लवकर संपला. आफ्रिकेकडून ए.बी. डीव्हिलियर्सने सर्वाधिक ३५ धावा केल्या. आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून बुमराह आणि शामीने प्रत्येकी ३, तर पंड्या आणि भुवीने प्रत्येकी २ बळी घेतले.
धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः सर्वबाद २८६
भारत पहिला डाव ः सर्वबाद २०९
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः (२ बाद ६५ वरून) ः कगिसो रबाडा झे. कोहली गो. शामी ५, हाशिम आमला झे. शर्मा गो. शामी ४, एबी डीव्हिलियर्स झे. कुमार गो. बुमराह ३५, फाफ ड्युप्लेसिस झे. साहा गो. बुमराह ०, क्विंटन डी कॉक झे. साहा गो. बुमराह ८, व्हर्नोन फिलेंडर पायचीत गो. शामी ०, केशव महाराज झे. साहा गो. कुमार १५, मॉर्ने मॉर्कल झे. साहा गो. कुमार २, डेल स्टेन नाबाद ०, अवांतर २, एकूण ४१.२ षटकांत सर्वबाद १३०
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ११-५-३३-२, जसप्रीत बुमराह ११.२-१-३९-३, मोहम्मद शामी १२-३-२८-३, हार्दिक पंड्या ६-०-२७-२, रविचंद्रन अश्विन १-०-३-०
भारत दुसरा डाव ः मुरली विजय झे. डीव्हिलियर्स गो. फिलेंडर १३, शिखर धवन झे. मॉरिस गो. मॉर्कल १६, चेतेश्वर पुजारा झे. डीकॉक गो. मॉर्कल ४, विराट कोहली पायचीत गो. फिलेंडर २८, रोहित शर्मा त्रि. गो. फिलेंडर १०, वृध्दिमान साहा पायचीत गो. रबाडा ८, हार्दिक पंड्या झे. डीव्हिलियर्स गो. रबाडा १, रविचंद्रन अश्विन झे. डी कॉक गो. फिलेंडर ३७, भुवनेश्वर कुमार नाबाद १३, मोहम्मद शामी झे. ड्युप्लेसिस गो. फिलेंडर ४, जसप्रीत बुमराह झे. ड्युप्लेसिस गो. फिलेंडर ०, अवांतर १, एकूण ४२.४ षटकांत सर्वबाद १३५
गोलंदाजी ः व्हर्नोन फिलेंडर १५.४-४-४२-६, मॉर्ने मॉर्कल ११-१-३९-२, कगिसो रबाडा १२-२-४१-२, केशव महाराज ४-१-१२-०
साहाने मोडला धोनीचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यष्टिमागे १० बळी घेत टीम इंडियाचा यष्टिरक्षक वृध्दिमान साहाने महेंद्रसिंग धोनीच्या नावावर जमा असलेला विक्रम मोडीत काढला. धोनीने २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत यष्टीमागे ९ बळी घेतले होते. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मॉर्ने मॉर्कलचा झेल पकडत साहाने धोनीला मागे टाकले. साहाने पहिल्या डावात डीन एल्गार, हाशिम आमला, फाफ ड्युप्लेसिस, क्विंटन डी कॉक आणि कगिसो रबाडा तर दुसर्या डावात क्विंटन डी कॉक, ड्युप्लेसिस, केशव महाराज आणि मॉर्ने मॉर्कल यांचे झेल पकडले. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॅक रसेल या यष्टीरक्षकाच्या नावावर जमा आहे. रसेलने १९९५ साली जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेविरुद्ध ११ झेल घेतले होते.