लष्कर दिनाचे (१५ जानेवारी) औचित्य साधून अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेने मिलिट्री स्टेशन गोवा, रोटरी क्लब पर्वरी व इव्हेंट बास्केट यांच्या सहकार्याने ‘रन फॉर जवान’ स्पर्धेचे ७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आल्याचे आयोजन समितीचे सचिव अनंत जोशी यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत अविनाश परमार, वैभव कळंगुटकर, गिरीश सावंत व भालचंद्र आमोणकर उपस्थित होते.
या स्पर्धेद्वारे जमा झालेली रक्कम माजी सैनिक, वीरपत्नी, ग्रामीण भागांतील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी तसेच गोव्यातील युवांना लष्करात सहभागी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे श्री. जोशी पुढे म्हणाले.
अग्निशामक दल, विद्यार्थी, लष्कर, वन्य विभाग, संरक्षण दल यांच्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. इतरांसाठी २०० रुपये शुल्क असेल. १० किलोमीटरसाठी ः बांबोळी स्टेडियम-गोवा विद्यापीठ-ओडशेल जंक्शन व परत बांबोळी स्टेडियम असा मार्ग ठरविण्यात आला आहे. तर, ५ किलोमीटरसाठी बांबोळी स्टेडियम ते ऑल इंडिया रेडिओ बिल्डिंग व परत असा मार्ग असेल. सर्व सहभागींना प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी ७८७५२३२०६९ किंवा ९८३४६९००४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील श्री. जोशी यांनी शेवटी केले.