येथील आंबेडकर मैदानावर काल मंगळवारी झालेल्या आय लीग स्पर्धेतील सामन्यात ईस्ट बंगालने इंडियन ऍरोजता २-० असा पराभव केला. आक्रमक मध्यरक्षक महमूद अल अम्ना याने १३व्या मिनिटाला सुरेख फ्री किकवर ईस्ट बंगालचे खाते उघडले तर १६व्या मिनिटाला जपानचा स्टार कात्सुमी युसा याने आघाडी दुप्पट केली. या विजयासह बंगालने ८ सामन्यांतून आपली गुणसंख्या १७ केली आहे. मिनर्वा पंजाबचा संघ १३ गुणांसह दुसर्या स्थानी आहे. दुसरीकडे इंडियन ऍरोजचे (७ गुण) सातवे स्थान कायम आहे. दुसरीकडे संजय सेन यांच्या मोहन बागानला काल प्रथमच यंदाच्या मोसमाक आपल्या घरच्या मैदानावर पराभवाची कडवट चव चाखावी लागली.
चेन्नई सिटी एफसीने त्यांचा २-१ असा पराभव केला. जॉन मायकल जोकिम (६वे मिनिट) याने चेन्नईला आघाडीवर नेल्यानंतर मध्यरक्षक अंसुमना क्रोमा (३६वे मिनिट, पेनल्टी) याने बागानला बरोबरी साधून दिली. पी. मोहनराज याला रेड कार्ड मिळाल्यानंतर दहा खेळाडूंनिशी खेळूनही चेन्नईने बागानवर कुरघोडी केली. त्यांचा बचावपटू विनियामिन शुमिको याने ७१व्या मिनिटाला चेन्नईचा दुसरा गोल केला. बागानने या सामन्यासाठी ‘स्टार्टिंग इलेव्हन’मध्ये तीन बदल करताना किन्शुक देबनाथ, निखिल कदम, रेनियर फर्नांडिस यांना बाहेर बसवताना राणा घरामी, अझरुद्दीन मलिक व सौरव दासला संधी दिली. चेन्नईने आलेक्झांडर जेसुराज, सेबेस्टियन थांगमुआंगसांग यांना वगळून चार्ल्स लुर्डुसामी व तारिफ अखंड यांना खेळविले.