मांडवीतील क्रूज बोटींवरील प्रखर विद्युत झोतांवर बंदी घाला

0
101

>> वाहतूक खात्याचे बंदर कप्तानांना पत्र

मांडवी नदीत पर्यटक व इतरांची सफारी करणार्‍या क्रुज बोटीवर वापरल्या जाणार्‍या उच्च दाबाच्या ट्रेसर, फोकस लाईट्‌समुळे मांडवी पूल आणि बांदोडकर मार्गावरील वाहन चालकांना धोका संभवतो. क्रूज बोटीवर वापरल्या जाणार्‍या या लाईट्‌सवर कारवाई करून बंदी घालावी, अशी सूचना करणारे पत्र वाहतूक खात्याने बंदर कप्तान खात्याला पाठविले आहे.

मांडवी नदीत पर्यटकांची जलसफारी करणार्‍या क्रूज व इतर बोटीवर ट्रेसर, फोकस लाईट्‌सचा वापर करण्यात येत असल्याचे वाहतूक खात्याला आढळून आले आहे. या लाईट्‌सचा अत्यंत प्रखर प्रकाशझोत मांडवी पूल आणि दयानंद बांदोडकर मार्गावरून वाहतूक करणार्‍या दुचाकी व इतर वाहन चालकांना अतिशय त्रासदायक ठरत आहे. या जोरदार लाईट्‌सच्या प्रकाशामुळे वाहनांना गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी बंदर कप्तान खात्याला २८ डिसेंबर २०१७ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मांडवी नदीत वाहतूक करणार्‍या क्रूज बोटीना अशा प्रकारच्या उच्च दाबाच्या लाईट्‌स न वापरण्याची सूचना करावी. तसेच क्रूज बोटीवर अशा प्रकारच्या लाईट्‌स लावण्यास त्वरीत बंदी घालावी, असेही पत्रात नमूद केले आहे. मांडवी नदीच्या पात्रात संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने क्रूज बोटी जलसफारी करतात. या क्रूज बोटीवर हायपावर ट्रेसर, फोकस लाईटचा सर्रास वापर केला जात आहे. या लाईट्‌सच्या जोरदार प्रकाश वाहन चालकांच्या डोळ्यावर पडल्यास समोरचे काहीच दृष्टीस पडत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पत्रासंबंधी बंदर खात्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला. परंतु, बंदर कप्तान जेम्स ब्रागांझा रजेवर असल्याने त्या खात्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही.