विदर्भने कोरले रणजी करंडकावर नाव

0
86

>> अंतिम सामन्यात दिल्लीचा ९ गड्यांनी पराभव

>> रजनीश गुरबानी सामनावीर

होळकर मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भने बलाढ्य दिल्लीचा ९ गडी राखून पराभव करत रणजी करंडक पटकावला. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच खेळणार्‍या व स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचणार्‍या या संघाने लढत जिंकून इतिहास रचला आहे.

पहिल्या डावात ५४७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर विदर्भाने दिल्लीचा दुसरा डाव फक्त २८० धावांत गुंडाळला. त्यानंतर विजयासाठीचे २९ धावांचे माफक लक्ष्य कर्णधार फैज फझलचा गडी गमावत पूर्ण केले. संजय रामस्वामी (९) आणि वसिम जाफर (१७) नाबाद राहिले.

तिसर्‍या दिवसअखेर ७ बाद ५२८ धावा केल्या होत्या. काल सोमवारी त्यांनी या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. विदर्भाचे शेवटचे तीन फलंदाज काल झटपट बाद करण्यात दिल्लीला यश आले. रविवारी १३३ धावांवर नाबाद असलेला अक्षय वाडकर त्याच धावसंख्येवर बाद झाला. तर सिद्धेश नेरळने कालच्या ५६ धावांमध्ये आणखी १८ धावांची भर घातली. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने १२५ धावांत ५ गडी बाद केले. चौथ्या दिवशी विदर्भचे शेपूट झटपट गुंडाळल्याचा आनंद दिल्लीच्या संघाला फार काळ उपभोगता आला नाही. २५२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दिल्लीच्या दुसर्‍या डावाची सुरुवात खराब झाली. वाखरेला आक्रमक फटका खेळण्याच्या नादात सलामीवीर चंडेला फक्त ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर शौरे (६२) आणि राणाने (६४) धावा काढत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. गुरबानीच्या अप्रतिम यॉर्करवर गंभीर ३२ धावा करून पायचीत झाला.
इतर खेळाडूंच्या अवसानघातकी फलंदाजीमुळे दिल्लीचा डाव २८० धावांत संपुष्टात आला. विदर्भकडून अक्षय वाखरेने ४, आदित्य सरवटेने ३, रजनीश गुरबानीने २, तर सिद्धेश नेरळने एक बळी घेतला.

धावफलक
दिल्ली पहिला डाव ः सर्वबाद २९५
विदर्भ पहिला डाव ः (७ बाद ५२८ वरून) ः अक्षय वाडकर झे. राणा गो. खेजरोलिया १३३, सिद्धेश नेरळ झे. पंत गो. सैनी ७४, रजनीश गुरबानी नाबाद ०, आदित्य ठाकरे झे. शोरे गो. सैनी ०, अवांतर २८, एकूण १६३.४ षटकांत सर्वबाद ५४७
गोलंदाजी ः आकाश सुदन २७-३-१०२-२, नवदीप सैनी ३६.३-५-१३५-५, नितीश राणा १३.१-१-३२-१, कुलवंत खेजरोलिया ३९-८-१३२-२, विकास मिश्रा ३८-६-१०२-०, ध्रुव शोरे १०-१-२७-०
दिल्ली दुसरा डाव ः कुणाल चंडेला झे. गुरबानी गो. वाखरे ९, गौतम गंभीर पायचीत गो. गुरबानी ३६, ध्रुव शोरे झे. वाडकर गो. सरवटे ६२, नितीश राणा झे. वाडकर गो. गुरबानी ६४, ऋषभ पंत झे. वानखेडे गो. नेरळ ३२, हिम्मत सिंग त्रि. गो. वाखरे ०, मनन शर्मा त्रि. गो. वाखरे ८, विकास शर्मा यष्टिचीत वाडकर गो. सरवटे ३४, नितीन सैनी झे. सरवटे गो. वाखरे ५, आकाश सुदन झे. वानखेडे गो. सरवटे १८, कुलवंत खेजरोलिया नाबाद १, अवांतर ११, एकूण ७६ षटकांत सर्वबाद २८०, गोलंदाजी ः रजनीश गुरबानी १८-२-९२-२, आदित्य ठाकरे १२-६-१४-०, आदित्य वाखरे २८-२-९५-४, आदित्य सरवटे ९-१-३०-३, सिद्धेश नेरळ ९-१-३९-१
विदर्भ दुसरा डाव ः फैज फझल पायचीत गो. खेजरोलिया २, संजय नाबाद ९, वसिम जाफर नाबाद १७, अवांतर ४, एकूण ५ षटकांत १ बाद ३२, गोलंदाजी ः कुलवंत खेजरोलिया ३-०-२१-१, आकाश सुदन २-०-७-०

तब्बल ६१ मोसमांनंतर
विदर्भच्या संघाला रणजी विजेतेपद पटकावण्यासाठी ६१ मोसम खेळावे लागले. १९५७-५८ साली त्यांनी सर्वप्रथम रणजी स्पर्धा खेळली होती. यंदाच्या मोसमात उतरण्यापूर्वी त्यांनी २६० सामने खेळले होते. केवळ गुजरात (८३ मोसम) व उत्तर प्रदेश (७२ मोसम) यांना जेतेपदासाठी विदर्भपेक्षा जास्त मोसम खेळावे लागले.

गुरबानी २७ वि. इतर ३२
विदर्भचा प्रमुख वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने बाद फेरीत १४.११च्या सरासरीने २७ बळी घेतले. तर विदर्भच्या इतर गोलंदाजांनी मिळून ३०.९६च्या सरासरीने ३२ गडी बाद केले. गुरबानीने या सामन्यांत चार वेळा डावांत पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी केली.

स्वप्नवत वाटचाल
पहिल्या सामन्यात विदर्भाने पंजाबवर एक डाव आणि ११७ धावांनी विजय मिळवला. विदर्भचा दुसरा सामना हा छत्तीसगडविरुद्ध घरच्या मैदानावर झाला, मात्र हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर सेनादल, बंगाल आणि गोवा यांना लागोपाठ पराभूत करत विदर्भने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.आपल्या घरच्या मैदानावरचा हिमाचल प्रदेशविरुद्धचा अखेरचा सामना मात्र त्यांनी अनिर्णित राखला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत केरळला तर उपांत्य सामन्यात कर्नाटकचा ५ धावांनी निसटता पराभव करुन त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

वासिम जाफरचा मिडास ट्‌च
वसिम जाफर याने नवव्यांदा रणजी चषक स्पर्धेची अंतिम फेरी खेळली. आठ वेळा मुंबईकडून व एकदा विदर्भकडून तो अंतिम सामन्यात उतरला. विशेष म्हणजे या नऊही वेळा तो विजेत्या संघाचा भाग होता. परंतु, यावेळी प्रथमच त्याला विजयी धावा करण्याची संधी मिळाली. विजयासाठी एका धावेची गरज असताना चौकार लगावून त्याने विदर्भचा विजय साकार केला. २० वर्षानंतर प्रथमच जाफरविना खेळणार्‍या मुंबईला मागील मोसमात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.