दक्षिण आफ्रिकेचा दुसर्‍या दिवशीच विजय

0
105

>> चार दिवशीय दिन-रात्र कसोटी

झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्या खेळविण्यात आलेला एकमेव दिन-रात्र स्वरुपाचा चार दिवशीय कसोटी सामन्याचा निकाल दुसर्‍याच दिवशी लागला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना १२० धावांनी जिंकला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर चार दिवसीय कसोटी सामन्याचा प्रयोग या सामन्याद्वारे करण्यात आला. गुलाबी चेंडूने व दिवसरात्र पध्दतीने हा सामना खेळविण्यात आला. परंतु दक्षिण आफ्रिकन संघासमोर या ऐतिहासिक सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि फॉलोऑननंतर दुसर्‍याच दिवशी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपला डाव ३०९ धावांवर घोषित करीत झिम्बाब्वेची स्थिती ४ बाद ३० अशी केली होती. दुसर्‍या दिवशी झिम्बाब्वेचे उर्वरित फलंदाजाना दक्षिण आफ्रिकेच्या धारधार भेदक मार्‍यापुढे जास्तवेळ स्थिरावता आले नाही आणि आणखी ३८
धावांची भर घालून ६८ धावांवर तंबूत परतले. कायल जार्विस (२३) आणि रायन बर्ल (१६) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. अन्य फलंदाज अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मोर्ने मोर्केलने २१ धावांत ५ तर कासिगो रबाडा व एन्डिले फेहलुक्वायो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

फॉलोऑननंतर २४१ धावांच्या पिछाडीवरून खेळताना दुसर्‍या डावतही झिम्बाब्वेच्या फलंदाजांचे आफ्रिकन गोलंदाजांसमोर जास्त काही चालले नाही आणि त्यांचा डाव चहापानाच्या सत्रानंतर ४२.३ षटकांत १२१ धावांवर संपुष्टात आला. क्रेग एर्विनने सर्वाधिक २३ जोडल्या. तर ब्रेंडन टेलर (१६), ग्रेमी क्रेमरने १८, चामू चिभाभा (१५), हेमिल्टन मसकाद्जा (१३) आणि ब्लेझिंग मुझारम्बानी (१०) यांनाच दुहेरी आकड्यांपर्यंत मजल मारता आली.

दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिकेतर्फे भारतीय वंशाचा केशव महाराज झिम्बाब्वेच्या फलंदाजीचा कर्दनकाळ ठरला. त्याने ५९ धावांत ५ बळींचे घबाड मिळविले. तर एन्डिले फेहलुक्वायोने ३ व वेर्नोन फिलेंडर आणि कासिगो रबाडा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.