महिला क्रिकेट संघाचे गोव्यात उत्स्फूर्त स्वागत

0
138

बंगालवर मात करीत वरिष्ठ महिला वन-डे क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून एलिट गटात प्रवेश केलेल्या गोव्याच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे काल दाबोळी विमानतळावर गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
गोव्याच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघाने प्लेट गटातील आपल्या अंतिम सामन्यात बलाढ्य बंगालवर ३७ धावांनी मात करीत वरिष्ठ महिला वन-डे क्रिकेट स्पर्धेचे गोव्याची स्टार अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे हिच्या नेतृत्वाखाली नेत्रदिपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकावले. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर अशी कामगिरी केल्यानंतर काल संघाचे गोव्यात दाबोळी विमानतळावर दिमाखात आगमन झाले.

यावेळी गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलीकर, उपाध्यक्ष मनोहर नाईक, खजिनदार जमिर कारोल, अब्दुल सय्यद व केतन भाटीकर आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच या कामगिरीबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूला तसेच सहकारी सदस्यांना प्रत्येकी ५० हजार रोख बक्षीस जाहीर केले. तसेच गोव्यासाठी खेळणार्‍या क्रिकेटपटूंना असोसिएशनतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे खजिनदार जमिर कारोल यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संघाच्या कर्णधार शिखा पांडे यांनी गोवा क्रिकेट संघटनेकडून मिळालेल्या दर्जेदार सहकार्यामुळे कालच्या या विजेतेपदाला गवसणी घातली. गोव्याचे नेतृत्व करण्यास माझा उत्साह आणखी वाढला असून यापुढे आणखी दर्जेदार कामगिरी करण्यास आमच्या प्रयत्न असणार असे त्या शेवटी म्हणाल्या.