व्यर्थ न हो बलिदान

0
236

हा स्वातंत्र्यदिन आपण दरवर्षीच्याच भाबड्या उत्साहाने साजरा करीत आहोत. यंदा या दिवसाला एक विशेष औचित्य आहे ते म्हणजे गोवा मुक्तीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९४७ साली देश स्वतंत्र झाला, तरी आपला गोवा पोर्तुगिजांच्या पारतंत्र्यात पिचत होता. दास्यत्वाच्या शृंखलांत अडकलेल्या गोमंतकीयांची आर्त हाक ‘‘भारताच्या ध्वजा म्हज्या, जाग रे बेगीन जाग, दर्यादेगेर खंगता तुजी सोबीत एक बाग’’ अशी बाकीबाबांच्या शब्दांतून आणि अभिषेकीबुवांच्या गहिर्‍या स्वरातून प्रकटत होती. केवळ देशभक्त गोमंतकीयांच्याच नव्हे, प्रत्येक देशवासीयाच्या मनास गोवा अजून पारतंत्र्यात आहे ही खंत बोचत होती, सलत होती. गोव्याच्या मुक्तीने देशाच्या स्वातंत्र्याला पूर्णत्व यावे ही आस बाळगणार्‍या या देशभक्तांना नेत्यांनी अहिंसक सत्याग्रहाचा मंत्र दिला आणि शस्त्रसज्ज पाशवी पोर्तुगिजांवर गोव्याच्या सर्व सीमांवरून निःशस्त्र सत्याग्रहींच्या लाटा धडकू लागल्या. गोव्याच्या सीमा देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या या वीरांच्या रक्ताने माखून निघाल्या. १५ ऑगस्ट १९५४ आणि १५ ऑगस्ट १९५५ या दोन स्वातंत्र्यदिनी जे काही घडले, तो इतिहास विस्मरणात जाऊ नये.

देशाच्या कानाकोपर्‍यातून हे सत्याग्रही आले होते. कोणी मध्यप्रदेशच्या राजघाटहून, कोणी राजस्थानमधील कोटाहून, कोणी आंध्रप्रदेशमधील विजयवाड्याहून… कुठून कुठून आलेली ही माणसे! कोणी मॅकेनिक, कोणी हॉटेल चालक, कोणाचे नुकतेच लग्न झालेले, कोणी शिक्षकाच्या सुखाच्या नोकरीत असलेले.. गोव्यासाठी आपले सर्वस्व लुटायला, प्राणांचे बलिदान द्यायला हे वेडे पीर का निघाले होते? गोव्याच्या सीमांच्या बलिवेदीवर स्वेच्छेने चढलेल्या; निःस्वार्थ भावनेने केवळ देशासाठी चढलेल्या त्या सर्व गोवेकर – बिगर गोवेकर वीरांचे स्मरण आजच्या या क्षणी व्हावे, त्यांच्या त्या महान त्यागाची माहिती आणि महती नव्या पिढीला कळावी या हेतूनेच नवप्रभेच्या या ४१ व्या वर्धापनदिन विशेषांकाची रचना केलेली आहे. १९५४ – ५५ च्या त्या पंधरा ऑगस्टला केवढा ओजस्वी इतिहास गोव्याच्या सीमांवर घडला! १५ ऑगस्ट १९५४ ला नॅशनल कॉंग्रेस, गोवाच्या तीन तुकड्या गोव्याच्या तीन बाजूंनी सत्याग्रहात उतरल्या. आल्फ्रेड आफोन्स या निधड्या वीराच्या नेतृत्वाखालील तेरेखोलच्या तुकडीने तर इतिहास घडवला. अकल्पित, अतर्क्य असा पराक्रम त्यांनी केला. या निःशस्त्र सत्याग्रहींच्या निर्धाराला भिऊन पोर्तुगीज सशस्त्र सैनिक पाठीला पाय लावून पळाले. त्या अनोख्या स्वातंत्र्यदिनी तेरेखोलचा किल्ला एक दिवस स्वतंत्र होता. गोव्याच्या मुक्तीच्या येऊ घातलेल्या क्षणाबाबत आश्वस्त करीत होता. १९५५ चा स्वातंत्र्यदिन उगवला तोच देशभक्तांच्या रक्ताचे सिंचन करीत. तेरेखोलला हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांची आहुती पडली, पालयेत पन्नालाल यादव बळी गेले, पत्रादेवीत सहोदरादेवी, कर्नालसिंग, राजाभाऊ महांकाळ, मधुकर चौधरी हुतात्मे झाले. कॅसलरॉकच्या १० नंबरच्या बोगद्याचा काळाकुट्ट अंधार देशभक्तांच्या त्यागाच्या तेजाने उजळून निघाला. गोव्यासाठी प्राण त्यागणार्‍या देशभक्तांच्या या सार्‍या उर्जस्वल कहाण्या आज विस्मृतीत चालल्या आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांमधून खरे तर ज्याची पारायणे व्हायला हवी होती, अशा या स्फूर्तीकथा दुर्मिळ पुस्तकांच्या पानांतून अडगळीत गेल्या आहेत. गोव्याच्या इतिहासातील पंधरा ऑगस्टच्या तेजस्वी घटनांचे हे काही सुवर्णकण या विशेषांकात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. पोर्तुगिजांच्या राजसत्तेला एकट्याने आव्हान देत राजधानी पणजीत येऊन थेट पालाशीपुढील ध्वजस्तंभावरचा पोर्तुगालचा झेंडा उतरवून तिरंगा फडकावणारे नारायण लक्ष्मण तथा हेमंत सोमण असोत वा ‘गोवा हा माझ्या भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो स्वतंत्र करण्यासाठी मी येथे आलो होतो’ असे पोर्तुगीज अधिकार्‍यांना ठणकावून सांगणारा नर्मदाप्रसाद शर्मा असो, जबड्यात हात घालण्याचे धाडस दाखवणार्‍या या वीरांना त्यापासून स्वतःसाठी काय मिळवायचे होते? ज्यांनी ज्यांनी निःस्वार्थ भावनेने गोव्याच्या मुक्तीचा ध्यास घेतला, त्या स्वातंत्र्यसंगरात उडी घेतली, त्या वीरांच्या पदरी केवळ आयुष्याची ससेहोलपटच आली. कोणी प्राणांची आहुती दिली, तर कोणाच्या भाळी तहहयात पंगूत्व आले. इतरांना पोर्तुगिजांच्या अमानुष मारहाणीच्या जखमांच्या खुणा आयुष्यभर वागवाव्या लागल्या. निःशस्त्र सत्याग्रहींवर बेदरकारपणे गोळ्या चालवण्यापासून सत्याग्रहींच्या गुद्द्वारात काठी खुपसण्यापर्यंतचे अत्याचार करणार्‍या पोर्तुगिजांचे आज मुक्त गोव्यात मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातही गोडवे गायिले जातात आणि या नंदनवनाच्या मुक्तीसाठी आयुष्याचा होम करणार्‍या देशभक्तांची मात्र कोणाला आठवणही येत नाही हा केवढा दैवदुर्विलास आहे! गोव्याच्या मुक्तीसाठी गोमंतकीयांनी जो त्याग केला, तेवढाच, किंबहुना त्याहून अधिक बिगरगोमंतकीयांनीही केलेला आहे. असे असताना गोव्याच्या अस्मितेच्या खोट्या कल्पनांचे ढोल बडवून दिशाभूल करणारे सरंजामशहांचे भाट असोत वा अनायासे मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ जनतेला लुटण्यासाठीच आहे असा समज करून घेऊन अमर्याद लुटालूट चालवलेले राजकारणी असोत, कोणता त्याग यांनी केला आहे म्हणून जनतेने यांचे गोडवे गावेत? गोव्याच्या आजच्या दुःस्थितीचे चित्र तर भयावह आहे. मिंधे मतदार, मस्तवाल नेते आणि जगभरातून आलेले माफिया यांनी परमेश्वराने प्रेमाने निर्मिलेले हे निर्मळ नंदनवन जवळजवळ उद्ध्वस्त केले आहे. मुक्त गोमंतकात मोकळा श्वास घेणार्‍या गोमंतकीयांचे एवढे कमालीचे राजकीय, सामाजिक अधःपतन का झाले, हा तुम्ही आम्ही गांभीर्याने विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे.

आजच्या गोव्याचे हे अत्यंत निराशाजनक चित्र बदलायचे असेल तर नव्या पिढीला गोव्याच्या मुक्तीचा हा तेजस्वी इतिहास समजला पाहिजे. या भूमीच्या मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करणार्‍यांच्या त्या त्यागाचे मोल समजले पाहिजे. त्याच प्रामाणिक भावनेने हा विशेषांक आज आपल्याला सादर करीत आहोत. पानांच्या मर्यादेत या विषयाला कदाचित आम्ही न्याय देऊ शकलेलो नसू, परंतु राष्ट्रचेतना जागविण्याच्या दिशेने एक ठिणगी जरी या प्रयत्नातून प्रकटली, तर परिश्रमांचे सार्थक झाले असे आम्ही मानू.

***

आज पत्रकारितेच्या क्षेत्रातही फार मोठी घुसळण सुरू आहे. रुपर्ट मर्डोक प्रकरणात स्पर्धेपोटी पत्रकारिता कोणत्या थराला गेली आहे, त्याचे दर्शन जगाला घडले. आपल्याकडे तर ‘पेड न्यूज’ मुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हताच पणाला लागलेली आहे. ज्या वृत्तपत्रांनी जनतेचा बुलंद आवाज बनायचे, ती वृत्तपत्रे एक तर राजकारणी चालवीत आहेत वा त्यांनी राजकारण्यांची तळी उचलून धरलेली आहे. या सार्‍या परिस्थितीत नवप्रभा हे एकमात्र दैनिक आपल्याला दिसेल जे पूर्णतः निष्पक्ष आहे. जे सत्य असेल तेच बोलणार या ‘भारत’कारांच्या बाण्याने वाटचाल करते आहे. वाचकांचा नवप्रभेवर आणि नवप्रभेचा आपल्या वाचकांवर ठाम विश्वास आहे. पैशाची प्रचंड ताकद मार्केटिंगसाठी वापरून बक्षिसे आणि भेटवस्तूंची आमिषे दाखवून, सवंग जाहिरातबाजीद्वारे आपले वृत्तपत्र वाचकाच्या गळी उतरवण्याच्या भोवतालच्या धडपडीतही आपली नवप्रभा अविचल आहे. नंदादीपासारखी प्रबोधनाची ज्योत तिने तेवती ठेवली आहे. अर्थात, आपल्यासारख्या निष्ठावान, चोखंदळ वाचकाच्या भरवशावर तर ही वाटचाल सुरू आहे. गतवर्षी याच दिवशी नवप्रभेचा चाळीसावा वर्धापनदिन साजरा झाला, तेव्हा चाळीस पानांचा एक विशेषांक आम्ही आपल्याला दिला होता. नवप्रभेच्या सुवर्णमहोत्सवाकडील वाटचालीचे सूतोवाच त्यात केले होते. नवप्रभेच्या वृत्तीगांभीर्याला धक्का न लावता त्याचे रूप अधिकाधिक तरुण, टवटवीत करण्याचा एक संकल्प त्यात होता. त्यानुसार नवप्रभेचे इंटरनेटवरील संकेतस्थळ नव्या अधिक आकर्षक रूपात गेल्याच महिन्यात आपल्या भेटीस आले आहे, इतकेच नव्हे तर तरुणाईच्या लाडक्या ‘फेसबुक’वरही नवप्रभा प्रकटली आहे. अवघ्या आठ दिवसांत जगभरातील वाचकांच्या ३२,५०० हिटस् नवप्रभेच्या संकेतस्थळाला मिळाल्या आहेत. आपल्या या उत्साही प्रतिसादामुळे लवकरच परिपूर्ण ‘ई – पेपर’ इंटरनेटवर उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील. नवप्रभेच्या रोजच्या अंकातही अंतर्बाह्य बदल येत्या काही महिन्यांत घडून येणार आहेत एवढेच याक्षणी नम्रपणे नमूद करीत आहोत. गतवर्षीच्या वर्धापनदिन विशेषांकाचे आपण उत्स्फूर्त स्वागत केलेत. या छोटेखानी विशेषांकाचेही आपण असेच स्वागत कराल, नवप्रभेला यापुढील काळातही आपले भक्कम पाठबळ द्याल असा विश्वासही बाळगतो. आपले आशीर्वाद सदैव लाभावेत.