नाताळपासून नववर्षापर्यंत राज्यभरात व विशेष करून नव्या मांडवी व जुवारी पुलावर काम चालू ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस फौजेची व्यवस्था करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलीस विभागाचे अधिक्षक दिनराज गोवेकर यांनी काल सांगितले.
नव्या मांडवी व जुवारी पुलाचे खांब उभारणे व अन्य काम ज्या परिसरात चालू आहे तेथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. ह्या ठिकाणी पोलीस शिपयांपासून उपाधीक्षक पदावरील अधिकार्यांची वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पर्वरीपासून पणजीच्या दिशेने सांताक्रुझपर्यंत नव्या मांडवी पुलाच्या कामामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. तशीच स्थिती जुवारी पुलाच्या कामामुळे कुठ्ठाळी परिसरात झालेली आहे. नाताळ व नववर्षापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने देशविदेशी पर्यटक येणार असल्याने वाहतुकीची कोंडी होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ह्या पुलांच्या बांधकामाच्या परिसरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा एक विशेष विभाग स्थापन करण्याची घोषणा केली होती. ह्या घोषणेनुसारच ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे गोवेकर यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक आले असल्याने पर्वरीपासून मडगावपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागत असल्याचे ते एका प्रश्नावर म्हणाले. नाताळ सणानिमित्त खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे ते म्हणाले.