म्हादईचे पाणी पिण्यासाठी देण्यास कर्नाटकशी द्विपक्षीय चर्चेची आमची तयारी आहे. मानवी दृष्टीकोनातून उत्तर कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागासाठी वाजवी आणि न्याय्य प्रमाणात पाणी देण्यास विरोध नाही. सध्या, म्हादईचे पाणी देण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आल्तिनो येथे सरकारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केले.
म्हादई जल लवादाने म्हादई पाणी वाटप प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्ली येथे गोव्याचे मुख्यमंत्री, कर्नाटकातील भाजप नेते येडियुरप्पा आणि भाजपचे कर्नाटक प्रभारी यांची संयुक्त बैठक बुधवारी घेतली. या बैठकीत म्हादईच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कर्नाटकातील भाजप नेत्यांनी उत्तर कर्नाटकात पिण्यासाठी ७.५६ टीएमसी पाणी देण्याची विनंती केली, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याबाबत द्विपक्षीय चर्चेबाबतचे पत्र मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कर्नाटक सरकारला पत्र पाठविले नाही. तर, कर्नाटकातील भाजपचे अध्यक्ष येडियुरप्पांना गुरूवारी पत्र पाठविले आहे. या पत्रात पिण्याच्या पाण्याच्या मागणीबाबत गोवा सरकारची भूमिका पर्रीकरांनी स्पष्ट केली. या पत्रात दुष्काळग्रस्त भागासाठी पिण्यासाठी वाजवी व न्याय्य प्रमाणात पाणी देण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. पर्रीकरांनी पाणी देण्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पिण्यासाठी पाणी देण्यास तत्वत: मान्यता दिलेली आहे. द्विपक्षीय चर्चेत सविस्तर चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. म्हादई पाणी प्रश्न जललवादासमोर न्यायप्रवीष्ठ असल्याने जल लवादाच्या चौकटीत राहून द्विपक्षीय बोलणी केली जाणार आहेत. तसेच द्विपक्षीय चर्चेची माहिती लवादाला दिली जाणार आहे. दिल्ली येथील बैठक पूर्वनियोजित होती. त्यामुळे दबावाचा प्रश्नच निर्माण होत नाही. यापूर्वी येडियुरप्पांंनी दोन – तीन वेळा म्हादईचा प्रश्नावर चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुध्दा म्हादईच्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. म्हादईचा प्रश्न लवादासमोर असल्याने कोणताही महत्वपूर्व निर्णय घेऊ शकत नाही. पिण्यासाठी पाणी देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर द्विपक्षीय चर्चेची तयारी दर्शविण्यात आली आहे. आपणाला म्हादईच्या प्रश्नाची जाणीव आहे. पिण्यासाठी पाणी नाकारले जाऊ शकत नाहीत. पण, म्हादईचे पाणी वळविण्यासाठी उभारण्यात येणार्या कालव्यांना विरोध आहे. गोव्याच्या हित रक्षणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. कर्नाटकाला किती पाणी देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. द्विपक्षीय बोलण्यांमध्ये किती पाणी व इतर विषयावर चर्चा होणार आहे. आपण येडियुरप्पांना पत्र पाठविले आहे. द्विपक्षीय बैठकीबाबतचे पुढील सोपस्कार त्यांनी पूर्ण करायचे आहेत. बैठकीसाठी वेळेचे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने म्हादईचा प्रश्न हाती घेतला आहे का ? या प्रश्नावर बोलताना पर्रीकर म्हणाले की, कर्नांटकातील लोकांनी भाजपला निवडून आणण्याची तयारी ठेवली आहे.
म्हादई रक्षणास गोवा फॉरवर्ड
कटीबध्द : विनोद पालयेकर
म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. म्हादईच्या रक्षणासाठी कटिबध्द आहोत. म्हादईच्या पाण्याचा एक एक थेंब सुध्दा वाचविला जाणार आहे. म्हादई प्रश्नावर गोवा फॉरवर्ड आणि जलस्त्रोत खात्याची भूमिका ठाम आहे, अशी प्रतिक्रिया जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री पर्रीकर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे कर्नाटकातील नेत्यांच्या म्हादई प्रश्नावर घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर जलस्त्रोत मंत्री पालयेकर वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
…तर जलस्रोत मंत्रिपद त्यागू : सरदेसाई
कर्नाटकला म्हादईचे पिण्यांचे पाणी देण्यास गोवा फॉरवर्ड पक्षाचा विरोध नाही. मात्र कालव्याद्वारे एका खोर्यांतून दुसर्या खोर्यांत पाणी नेण्यास तीव्र विरोध आहे. आमच्या विरोधाला न जुमानता पाणी दिले तर आमच्या पक्षाकडे असलेले जलस्रोत खात्याचा मंत्रिपदाचा त्याग करण्यास तयार आहोत असा इशारा कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काल येथे दिला.
जलस्रोत मंत्रीपद गोवा फॉरवर्डचे विनोद पालयेकर यांच्याकडे आहे. विजय सरदेसाई यांनी सांगितले की पीण्याचे पाणी देण्यासाठी विचार करू. मात्र कालव्यांतून सोडण्यास तीव्र विरोध आहे. म्हादईचे पाणी दिल्यास गोव्याला पाणी मिळणार नाही. तसे झाले तर मंत्रीपदाचा काय उपयोग असे ते म्हणाले.