श्रावणाच्या अंगी, उत्सवांच्या रंगी

0
109

राजेंद्र पां. केरकर

चैत्रादी बारा महिन्यांत पाचवा श्रावण म्हणजे सृष्टीला लागलेला पाचवा हिरवागार महिना आहे. गोवाकोकणातील सृष्टिलावण्य श्रावणातच उत्स्फूर्तपणे प्रकट होते. वृक्षवेली एका आगळ्या वेगळ्या सौंदर्याचा आविष्कार श्रावणात घडवत असतात. केवळ वृक्षवेलीच नव्हे तर एरवी कुणाच्या विशेष लक्षातही न येणारी तृणपाती, लहानातल्या लहान वनस्पती आपल्यातील पुष्पलावण्याचे प्रकटीकरण जणू श्रावणभाद्रपदात करतात, आणि त्यामुळे सृष्टीचा हा आनंदसोहळा व्रतवैकल्ये, सणउत्सव यांच्या सादरीकरणातून द्विगुणित व्हावा म्हणूनच आपल्या पूर्वजांनी श्रावणात वृक्ष, वनस्पती, तृणपाती यांच्यावर डोलणार्‍या पुष्पवैभवाला पूजनविधीत महत्त्वाचे स्थान प्रदान केले. पाने, फुले, तृणपाती यांचा समावेश पूजाविधीत केला गेला, कारण जेणे करून घराच्या चौकोनी विश्‍वात बंदिस्त असणार्‍या माताभगिनींना माळरानावर अथवा घरापासून काही अंतरावर असणार्‍या जंगलात फुलपत्री गोळा करण्यासाठी तरी आपल्या शेजारणींबरोबर जाणे शक्य व्हावे.

श्रावण महिन्यात उत्सवांची एका पाठोपाठ रेलचेल असल्याने आपल्या पूर्वजांनी गौरीगणपतीपर्यंत शाकाहाराचा नियम बनवला. निसर्गातील दिव्यत्वाचे दर्शन व्हावे तर आपले मन सात्त्विक आहाराद्वारे तामसी वृत्तीपासून दूर राहील आणि भगवद्भक्तीत रमून विधायक कार्यासाठी प्रेरित होईल ही भावना होती. त्यामुळे श्रावणात नाना व्रतवैकल्यांच्या संगतीत कीर्तनप्रवचनासारख्या भक्तिरसपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लग्न करून सासरी गेलेल्या नवविवाहितेला आपल्या माहेरच्या माणसांची प्रकर्षाने श्रावणाच्या आगमनापूर्वी आठवण होते आणि त्यासाठी आदित्यपूजनाचा एक तरी आदित्यवार म्हणजे आयतारसाजरा करण्यास त्या माहेरी येतात. सूर्य हा तेजाचा, प्रकाशाचा निधी असल्याने आणि चिरंजीवी असल्याने सूर्यासारखे तेजस्वी, निरोगी आयुष्य, आरोग्य आपल्या जीवनसाथीलापतीलालाभावे म्हणून गोवाकोकणात आयतार पूजनाची परंपरा निर्माण झाली. जंगलात माळरानावर उगवणार्‍या आणि फुलणार्‍या फुलांना, पत्रींना गोळा करण्यासाठी पूर्वी वयस्क बायांबरोबर सुवासिनी जायच्या आणि मनोभावे आयतार म्हणजे आदित्याचे पूजन करायच्या. पूर्वी घराच्या भिंती मातीच्या असायच्या. त्यामुळे शेणाने अथवा विशिष्ट मातीने सारवलेल्या भिंतीवर सूर्याचे प्रतीकात्मक चित्र रेखाटले जायचे. काही ठिकाणी चंद्र, सूर्य रेखाटतात तर काही ठिकाणी चुन्याच्या रंगाचे ठिबके काढतात. प्रत्येक रविवारी आदित्यपूजन झाल्याबरोबर उपवास करणार्‍या सुवासिनी वेगवेगळे पारंपरिक अन्नपदार्थ तयार करतात आणि त्यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदाने आस्वाद घेतात.

आषाढ सोपलो, मामंजी शिरवाण लागलो

मियातर आयतार धरतूय

अशा लोकगीतांतून सुवासिनी पूर्वीच्या काळी आदित्य पूजनाची तयारी करायच्या. शाकाहारी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी तेल, तूप, कडधान्ये यांची विशेष गरज भासत असल्याने सासर्‍याकडे हे सारे घरात आणण्याची विनंती जुन्याकाळी लोकगीताच्या गायनातून व्हायची. एका रविवारी तांदळापासून गूळ, खोबरे घालून मुटले, तर दुसर्‍या रविवारी गूळखोबर्‍याचे पोळे तयार केले जायचे. गोव्याला अन्नसंस्कृतीचा जो समृद्ध वारसा लाभलेला आहे त्या वैविध्यपूर्ण वारशाचे तनामनाला तृप्त करणारे दर्शन शाकाहारी पंचपक्वानांतून व्हायचे. ब्राह्मण समाजात पुरुषदेखील आदित्यपूजन करतात.

सोमवार हा शिवाचा दिवस असल्याने, गावातली किंवा अन्य ठिकाणी असलेली शिवालये भाविकांनी गजबजलेली असतात. बेलाची पाने शिवाला अर्पण करण्यासाठी किंवा अभिषेक करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. चंद्रेश्‍वरभूतनाथाचे मंदिर पर्वतावर वसलेले असल्याने आणि येथील सारा परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला असल्याने इथे येणार्‍या भाविकांना आपण साक्षात कैलासावर असल्याचे समाधान या श्रावणात प्राप्त होते. ब्राह्मण सुवासिनी शिवामुठहा प्रतीकात्मक शिवपूजनाचा विधी करतात. मंगळवार हा पर्वत धारण करणार्‍या पार्वती मंगळागौर. नवविवाहित ब्राह्मण सुवासिनीत मंगळागौरीला आनंदोत्सवाचा अपूर्व सोहळा असतो. यावेळी फुगड्या, उखाणी, लोकगीते यांच्या पारंपरिक गाण्यांनी रात्र जागवली जाते. नृत्य, गायनाच्या सादरीकरणामुळे स्त्रियांच्या अंगी वास करणार्‍या कलेला एक व्यासपीठ लाभते.

बुधवार हा श्रीकृष्णाच्या रूपातील विठ्ठलाचा दिवस असल्याने त्या दिवशी त्याच्या गळ्यात तुळशीची माळा अर्पण करणे भाविक आपले कर्तव्य मानतात. ‘कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू, तेणे लाविला मज वेडूअशा या विठ्ठलाचे स्मरण प्रत्येक दिवशी करणे भाविक इष्टप्रद मानत असले तरी श्रावणातल्या बुधवारी त्याच्या भक्तीला उधाण आलेले असते. त्रिगुणात्मक दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा त्रिवेणी संगम. गुरुवार हा दत्तात्रयाशी निगडित असून श्रावणातला प्रत्येक गुरुवार हा भाविकांसाठी एक पर्वणीच असते. दत्तमंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आदी माध्यमांतून दत्तात्रयाचे स्मरण केले जाते. लक्ष्मी म्हणजे समृद्धी. शुक्रवार हा समृद्धीच्या देवतेचा आणि हल्लीच्या काळात संतोषीमातेचा दिवस ठरलेला आहे. त्यामुळे महालक्ष्मीच्या मंदिरात भाविक या दिवशी हमखास जातात. शनिवार हा शनिदेवाचा दिवस असला तरी महाबली हनुमानाचे विशेष पूजन करण्यासाठी रुईच्या पानाफुलांच्या माळा करून भाविक शनिवारी मारुती मंदिरात जाणे पसंत करतात.

आठवड्यातले सगळे दिवस विविध देवदेवतांच्या भजनपूजनाशी निगडित असताना श्रावणात विशेष उत्सवही साजरे केले जातात. नागपंचमी म्हणजे विषारी, भयप्रद वाटणार्‍या नागाच्या पूजनाचा दिवस. शेतकर्‍यांना त्रास देणारे उंदीर हे सापाचे भक्ष्य असल्याने, साप उंदरांपासून शेताचे रक्षण करतो म्हणून त्याच्याविषयी असलेली कृतज्ञता नागपंचमी दिवशी कुठे मृण्मयी रूपात तर कुठे चंदन, हळदीच्या लेपाने चित्र रेखाटून व्यक्त केली जाते. पातोळ्या, अळवाची भाजी आणि सोलकढी अशा अन्नातून नागपंचमीची तृप्ती भाविक मिळवतात. श्रावणी पौर्णिमा हा तीन सणांचा समन्वय. सर्वसामान्य समाजातल्या बांधवांना जानवे किंवा यज्ञोपवीत धारण करण्याची संधी या दिवशी प्राप्त होते. घरातला कर्ता पुरुष देवघरातील देवतांना यज्ञोपवीत अर्पण करून आदरयुक्त भावनेने ते आपल्या शरीरावर धारण करतो. गावातील देवतांना मानकरी यज्ञोपवीत अर्पण करतात. त्यामुळे श्रावणी पौर्णिमा ही सुताची पूनवम्हणून ओळखली जाते. ब्राह्मण समाजात हा दिवस श्रावणी उपकर्माम्हणून साजरा केला जातो. रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून रेशमी भावबंधनाची प्रचिती देते. रत्नाकररूपी सागराचे पूजन करून, त्याला नारळ अर्पण करून मच्छीमार बांधव कृतज्ञता व्यक्त करतात म्हणून हा नारळी पौर्णिमेचा दिवस. श्रावणातला तिसरा मंगळवार डिचोलीतील नार्वेला मसणदेवीच्या जत्रेसाठी पूर्वापार प्रसिद्ध आहे. पंचगंगा म्हणजे खांडेपार, डिचोली, कुडणे, व्हाळवटी किंवा वाळवंटी आणि कुंभारजुवा कालव्याच्या मार्गे येणारी जुवारी अशा पाच नद्यांच्या संगमस्थळी असलेली ही जागा पवित्र मानली जाते. मसणदेवीच्या परिसरात शेकडो थडगी आहेत. या सर्वांची देवी असलेली आणि भुताखेतांच्या बाधेपासून रक्षण करणारी वारुळाच्या रूपातील ही मसणदेवी भाविकांत प्रसिद्ध आहे. गोकुळाष्टमीचा दिवस संपूर्ण गोव्यात कृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. बाल, युवक दहीहंडीफोड कार्यक्रमात सहभागी होतात. काही ठिकाणी मृण्मयी कृष्ण प्रतिमेचे पूजन करून भजनाचा कार्यक्रम होतो. परंतु नार्वेला मांडवीच्या उजव्या तीरी अष्टमीच्या जत्रेला येणारे भाविक मात्र या दिवशी आपल्या मृत आप्तांचे स्मरण करण्यासाठी धार्मिक विधी करतात. परिसरातील देवदेवतांच्या पालख्या घाटावर महायात्रेत सहभागी होण्यासाठी येतात. ही जत्रा संपन्न झाल्यावर सायंकाळी कुणी सहसा येथे थांबत नाही, कारण सूर्यास्त झाल्यावर या ठिकाणी भुतांची जत्रा भरते असा समज लोकमानसात रूढ आहे.

श्रावण हा व्रतवैकल्यांचा आनंदमयी महिना. सृष्टी अन्नपूर्णेच्या रूपात सर्वांचे स्वागत करण्यास सिद्ध असते. सृष्टीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूनेच श्रावणाच्या या प्रसन्न वातावरणात भर घालण्यासाठी सणांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मानवी जीवनात निसर्ग आणि पर्यावरणाला विशेष स्थान असून श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी परमेश्‍वराच्या नानारूपांचे स्मरण करून आपण धरित्रीविषयी कृतज्ञता व्यक्त करीत असतो. श्रावण म्हणजे भक्ती, चारित्र्य, सदाचार यांचा समन्वयच होय!