काश्मीरमध्ये हिमस्खलनात लष्कराचे ५ जवान बेपत्ता

0
98

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्रीपासून प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी सुरू झाली असून गुरेज येथील दुर्गम पहाडी भागात हिम-स्खलनामुळे लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले आहेत. लष्करी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाचही जवान सेवा बजावत असताना ही दुर्घटना घडली असून त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. दरम्यान येथील अती शीत लहरींमुळे देशाच्या अन्य भागांतही येत्या दोन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात गुरेज भागातच १० जवान तसेच ४ नागरीक हिमपातात मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान प्रचंड बर्फवृष्टीसह पाऊसही झाल्याने मंगळवारी जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग व मुघल रोड बंद करण्यात आला होता. बनिहाल विभागात बर्फवृष्टी तसेच मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर राजमार्ग बंद ठेवावा लागला.

खराब हवामानामुळे त्रिकुला टेकड्या तसेच वैष्णोदेवी गुंफा येथे भाविकांसाठी उपलब्ध असणारी हेलिकॉप्टर सेवा सलग दुसर्‍या दिवशी स्थगित करण्यात आली. तसेच राजौरी येथील पीर पंजल भागातही प्रचंड बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले.