
टीम इंडियाचा २०१९-२०२३ या कालावधीतील फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काल सोमवारी जाहीर केला. यानुसार या कालावधीत भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून ८१ सामने खेळणार आहे. कसोटी सामन्यांच्या संख्येत कपात करून खेळाडूंच्या मागणीनुसार खेळण्याच्या दिवसांची संख्या कमी करण्यात आली आहे. आयसीसी आयोजित स्पर्धा वगळता इतर कोणत्याही स्तरावर पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचे आपले धोरण बीसीसीआयने कायम ठेवले आहे.
बीसीसीआयच्या सोमवारी झालेल्या विशेष आमसभेत एफटीपीला मान्यता देण्यात आली. नवीन एफटीपीनुसार भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व द. आफ्रिकेविरुद्ध जास्त सामने खेळणार आहे. यापूर्वी प्रस्तावित पाच वर्षांच्या एफटीपीमध्ये (२०१९-२०२३) केवळ ५१ सामन्यांचा समावेश होता. नवीन एफटीपीमध्ये मात्र यात ३० सामन्यांची भर पडली असल्याचे मंडळाचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी स्पष्ट केले. मायदेशातील सामन्यांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी दिवसांची संख्या २० टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले. क्रिकेट खेळण्याच्या दिवसांची संख्या कमी करण्याच्या कोहलीच्या विनंतीला मान देऊन बीसीसीआयने दिवसांची संख्या कमी केली आहे. २०१५-२०१९च्या एफटीपीत ३९० दिवस खेळण्याचे होते. आता ही संख्या केवळ ३०६ दिवस असेल.
आयसीसी आयोजित स्पर्धा असल्याने २०२१ व २०२३ मध्ये भारतात होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफी व क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा या एफटीपीत समावेश नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांत मायदेशातील सामने व विदेशात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात खेळण्याचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या बीसीसीआयच्या सामना प्रसारणाचे हक्क स्टार स्पोटर्सकडे असून पुढील वर्षी मार्च महिन्यात त्यांच्यासोबतचा करार संपणार आहे. त्यामुळे प्रसारण करार नजरेसमोर ठेवून एफटीपीची रचना तयार करण्यात आली आहे. कोची टस्कर्स या आयपीएलच्या माजी फ्रेंचायझीला ८५० कोटी देण्याबाबत चर्चा यावेळी झाली. कायदेतज्ञांशी विचारविनिमय करून कोर्टबाहेर कमी रक्कम अदा करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावता येण्याबाबत शक्यता पडताळून पाहण्याचे ठरविण्यात आले. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आयपीएलचे माजी संचालक ललित मोदी यांची असोसिएशनमध्ये कोणतीही ढवळाढवळ नसेल या अटीवर निलंबन मागे घेण्यात आले.
अफगाणिस्तानचे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण
अफगाणिस्तानचा संघ आपला पहिलावहिला कसोटी सामना भारताविरुद्ध भारतात खेळणार असल्याचे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सोमवारी जाहीर केले. उभय क्रिकेट मंडळांच्या सहमतीने सामन्याचे स्थळ व तारीख जाहीर केली जाणार आहे. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तान तसेच आयर्लंडला कसोटी दर्जा दिला होता. आयर्लंडचा संघ मे महिन्यात पाकिस्तानविरुद्ध आपल्या कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा करणार आहे. अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवून त्यांना आपल्या गटात ओढण्याची चाल बीसीसीआयने खेळली आहे.
पाकवर कुरघोडी करण्याचा बीसीसीआयचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. झिंबाब्वेचा संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार होता. परंतु, मार्च महिन्यात होणार्या विश्वचषक पात्रता फेरीसाठी अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी अफगाणिस्ताना नकार कळविला होता. ऑक्टोबर महिन्यात अफगाणिस्तान मंडळाचे अध्यक्ष आतिफ मशाल व मुख्य कार्यकारी अधिकारी शफिकुल्ला स्टॅनिकझाय यांनी जोहरी यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी त्यांनी कसोटी सामना खेळण्याची विनंती केली होती.