येथील मामलेदार कार्यालय, नागरी पुरवठा कार्यालय, पोलीस आणि गॅस कंपनीचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने ताळगाव, मिरामार आणि बांबोळी येथील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून घरगुती वापराचे सात गॅस सिलिंडर काल जप्त केले.
हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. ताळगाव येथील एका हॉटेलमधून दोन सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. बांबोळी येथील एका रेस्टॉरंटमधून ३ सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. मिरामार येथे दोन हातगाड्यातून दोन सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहेत.
तिसवाडीच्या संयुक्त मामलेदार इशा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या मोहीमेत नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षक सीमा गुडेकर, उपनिरीक्षक अशोक खरबे, विनायक मुळगावकर, गॅस कंपनीचे अधिकारी प्रतीक श्रीवास्तव, वैभव भगत, संकेत जाधव, पोलीस उपनिरीक्षक रश्मी बिडीकर व इतर कर्मचार्यांनी सहभाग घेतला.