>> भारताने मालिका जिंकली
नवोदित धनंजय डीसिल्वा (११९, जखमी निवृत्त), पदार्पणवीर रोशन सिल्वा (नाबाद ७४) यांना कर्णधार दिनेश चंदीमल (३६) व निरोशन डिकवेला (नाबाद ४४) यांनी तोलामोलाची साथ देत भारताविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णित राखली. भारताला अखेरच्या दिवशी ७ गड्यांची आवश्यकता होती. परंतु, यजमानांना श्रीलंकेचे केवळ दोनच गडी बाद करता आले. कोलकाता कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर नागपूर कसोटीत डावाने विजय मिळविल्यामुळे भारताने तीन सामन्यांची मालिका १-० अशी खिशात घातली. या मालिका विजयासह भारताने सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ४१० धावांचा पाठलाग करताना लंकेने दुसर्या डावात ५ बाद २९९ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून जडेजाने ३, अश्विन आणि शामीने प्रत्येकी एक बळी घेतला. विराट कोहली सामनावीर व मालिकावीर ठरला.
धावफलक
भारत पहिला डाव ७ बाद ५३६ घोषित
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद ३७३
भारत दुसरा डाव ः ५ बाद २४६ घोषित
श्रीलंका दुसरा डाव (३ बाद ३१ वरून)ः धनंजय डीसिल्वा जखमी निवृत्त ११९, अँजेलो मॅथ्यूज झे. रहाणे गो. जडेजा १, दिनेश चंदीमल त्रि. गो. अश्विन ३६, रोशन सिल्वा नाबाद ७४, निरोशन डिकवेला नाबाद ४४, अवांतर ७, एकूण १०३ षटकांत ५ बाद २९९
गोलंदाजी ः ईशांत शर्मा १३-२-३२-०, मोहम्मद शामी १५-६-५०-१, रविचंद्रन अश्विन ३५-३-१२६-१, रवींद्र जडेजा ३८-१३-८१-३, मुरली विजय १-०-३-०, विराट कोहली १-०-१-०
सलग नववा मालिका विजय
श्रीलंकेविरुद्धची मालिका १-० अशी जिंकून भारताने सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे या सर्व मालिका विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या आहेत. भारताने ९ कसोटी मालिका विजयांपैकी ६ मालिका देशात, २ श्रीलंकेमध्ये आणि एक वेस्ट इंडीजमध्ये जिंकली आहे. यादरम्यान भारताने ३० सामन्यांपैकी २१ सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला. भारतापूर्वी ऑस्ट्रेलियाने २००५ ते २००८ दरम्यान सलग ९ कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.