…तर पणजी, दोनापावलात हाहाकार माजला असता

0
100

गेले काही दिवस केरळ व तामिळनाडू राज्यांत धुमाकूळ घातलेले ओखी चक्रीवादळ काल संध्याकाळी गोव्यातून गुजरातच्या दिशेने सरकले असून ते सौराष्ट्र व कच्छला धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संचालक मोहनलाल साहू यानी काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकू लागले असून त्यामुळे ह्या वादळापासून गोव्याला असलेला धोका दूर झाला असल्याचे साहू यानी स्पष्ट केले. ह्या वादळाने जर गोव्याला धडक दिली असती तर राजधानी पणजीतील मिरामार, दोनापावलासह उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात मोठा हाहाकार माजला असता. मिरामार किनारा पणजी शहरापासून अगदीच जवळ असल्याने मिरामार, कांपाल आदी पारिसरात प्रचंड पाणी घुसले असते. कांपाल परिसरातील कला अकादमी व आसपासची घरे पाण्याखाली गेली असती, असे साहू म्हणाले.

मच्छीमारांना इशारा

सोमवारीही मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याचे सांगून समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात जाणे अत्यंत धोक्याचे असल्याचे साहू यांनी सांगितले. ओखी चक्रीवादळामुळे केरळ व तामिळनाडूत जोरदार पाऊस झाला मात्र गोव्यात पाऊस कोसळला नसल्याचे साहू यांनी सांगितले.

मीरामार सर्वांत असुरक्षित
राज्यातील सर्व किनार्‍यापैकी राजधानीत असलेला मीरामार हा सर्वांत असुरक्षित असा किनारा असल्याचे मोहनलाल साहू यांनी सांगितले. मोठे चक्रीवादळ आल्यास मीरामार किनार्‍यावरून पणजी शहरात पाणी घुसण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले.