हिंदी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण शशी कपूर यांचे काल प्रदीर्घ आजाराने येथील कोकिलाबेन इस्पितळात वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर, करण कपूर असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
सततच्या आजारपणामुळे बर्याच काळापासून शशीकपूर सिने सृष्टीपासून दूर होते. बाल कलाकार म्हणून १९४० पासून सिनेसृष्टीत आल्यापासून आजवर त्यांनी ११६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ६१ चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. १९८४ साली पत्नी जेनिफर यांच्या मृत्यूनंतर ते एकटे रहात होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत बिघडत गेली होती. शशीकपूर यांना २०११साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यांनी हिंदीबरोबरच इंग्रजी चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या. जुनून (१९७८), कलियुग (१९८०), ३६ चौरंगी लेन (१९८१), विजेता (१९८२), उत्सव (१९८४) अशा चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली. जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी, कपडा और मकान, चोर मचाए शोर, दिवार, कभी कभी, फकिरा अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. स्टार अभिनेता झाल्यानंतरही नाटकांकडे वळण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
पृथ्वी थिएटरद्वारा त्यांनी या क्षेत्रातही योगदान दिले. कोलकात्यात १८ मार्च १९३८ साली जन्मलेले शशीकपूर हे पृथ्वीराज कपूर यांंचे सर्वात धाकटे पुत्र होते. शशी कपूर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही ब्रिटिश व अमेरिकी चित्रपटांमधूनही काम केले आहे. द हाऊस होल्डर, ‘शेक्सपियरवाला, बॉम्बे टॉकिज, हिट अँड डस्ट अशा चित्रपटांचा त्यात समावेश आहे.