
स्पॅनिश खेळाडू फेरान कोरोमिनासने नोंदविलेल्या या पर्वातील पहिल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर एफसी गोवाने सात गोलांच्या थरारात रंगलेल्या सामन्यात बंगळुरू एफसीची विजयी घोडदौड ४ अशी रोखताना हीरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पूर्ण गुणांची कमाई केली.
पहिल्या सत्राच्या ३६व्या बेंगळुरूचा प्रमुख गोलरक्षक गुरप्रीत सिंग याने एफसी गोवाच्या मान्युएल लान्झारॉतच्या डोक्यावर ठोसा मारल्याने त्याला रेफ्रीने लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठविल्याने सामन्याची ५४ मिनिटे बंगळुरूला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. बदली गोलरक्षक अभ्रा मोंडल याला मैदानात पाठविताना राहुल भेके याला माघारी बोलावणे बंगळुरूला भाग पडले.
पूर्वार्धात कोरोमिनासने अनुक्रमे १६ व ३३व्या मिनिटास गोल केल्यानंतर मान्युएल लान्झारॉत याने ४०व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारला. बंगळुरूसाठी पूर्वार्धात एक गोल मिकू याने २१व्या मिनिटास नोंदविला. उत्तरार्धातील बेंगळुरूने दमदार पुनरागमन करताना एरिक पार्तालू याने ५७व्या मिनिटास गोल नोंदविल्यानंतर ६०व्या मिनिटास मिकू याने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून बंगळुरूस ३-३ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेच ६३व्या मिनिटास कोरोमिनास याने सामन्यातील वैयक्तिक तिसरा गोल नोंदवत आपली हॅट्ट्रिक साधतानाच एफसी गोवाची आघाडी ४-३ अशी वाढविली. त्याने नोंदविलेली ही यंदाच्या स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक ठरली. कारोमिनासचीच सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.