राज्यातील पंचायत क्षेत्रातील शौचालय सर्वेक्षणाच्या कार्यात स्त्री शक्ती अभियान कार्यक्रमाअर्ंतगत स्वयं सहाय्य गटांची मदत घेतली जाणार आहे. पंचायत खात्याकडून स्वच्छता मोहीमे अंतर्गत शौचालयांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सरकारी पातळीवर २०१९ पर्यत राज्य हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणातून शौचालयांच्या एंकदर स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी – गोवा आणि इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऍण्ड डेवलोपमेंट यांचेही साहाय्य घेतले जाणार आहे. स्वयं सहाय्य गटांबरोबरच कॉम्युनिटी रिसोर्स पर्सन (सीआरपी), ब्लॉक रिर्सोस पर्सन (बीआरपी) यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. स्थानिक गट अधिकार्यांच्या देखरेखीखाली सर्वेक्षण एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश आणि डिचोली तालुक्यातील ८९ पंचायत क्षेत्रातील ६९१ प्रभागात सर्वेक्षण केले जाणार आहे. तर दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या कार्यात ९७ पर्यवेक्षक आणि ६९५ गणक सहभागी होणार आहेत. दुसर्या टप्प्यात तिसवाडी, धारबांदोडा आणि फोंडा तालुक्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात सांगे, सालसेत, मुरगाव आणि सत्तरी तालुक्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील किती कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे आणि किती कुटुंबांकडे शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही याची सविस्तर माहिती तयार केली जाणार आहे.