
थिंकिंग ऑफ हिम हा गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील आपला चित्रपट इफ्फीसाठीचा क्लोजिंग फिल्म ठरला याचा आपणाला खूप आनंद होत असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक पाब्लो सीजर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. चित्रपटाचे निर्माते सुरज कुमार यांच्याशी २०१५ साली आपण इफ्फीसाठी आलो तेव्हा भेट झाली होती. या भेटीतच टागोर यांच्यावरील चित्रपटासंबंधी त्यांच्याशी बोलणी झाली होती. आता त्याच चित्रपटाने इफ्फीचा समारोप होत असल्याचे पाहून फार आनंद होत असल्याचे ते म्हणाले. टागोर यांच्यावरील हा चित्रपट बनवताना खूप अभ्यास करावा लागला. त्यासाठी आम्ही शांतीनिकेतनमध्येही जाऊन आलो. हा चित्रपट बनवणे हा एक फार वेगळा अनुभव होता असे सुरज कुमार यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना अभिनेत्री रायमा सेन म्हणाल्या की, पाब्लो सीजर यांची दिग्दर्शन करण्याची पद्धत फार वेगळी आहे. चित्रीकरणापूर्वी त्यांनी खूप तालमी घेतल्या. एक अभिनेत्री म्हणून या चित्रपटात काम करताना खूप समाधान मिळाल्याचे त्या म्हणाल्या. चित्रपटाचे निर्माते सुरज कुमार व चित्रपटात प्रमुख भूमिका केलेली अभिनेत्री एलोयनोरा व्हेक्सलट यांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले.