>> भाजपच्या मंत्र्यांना पक्षादेश
भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारी, गार्हाणी जाणून घेण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांना आठवड्यातून एक दिवस भाजप मुख्यालयात उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सुध्दा भाजप कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधून समस्या, तक्रारी जाणून घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
पर्रीकर मंत्रिमंडळात भाजपचे चार तर सहयोगी पक्षाचे सात मंत्री आहेत. भाजपने आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून बूथ विस्तार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत भाजपचे पदाधिकारी बुथांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून तक्रारी, गार्हाणी जाणून घेत आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी भाजप मंत्र्यांना पक्षाच्या कार्यालयात आठवड्यातून एक दिवस उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांशी जास्त परिचय नसल्याने एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी गार्हाणी मांडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी परिचय वाढावा या उद्देशाने मंत्र्यांना भाजप मुख्यालयात दोन तीन तास उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर सर्वच खात्यांबाबत कार्यकर्त्यांची गार्हाणी ऐकून घेणार आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी भाजप कार्यालयात उपस्थित राहून कार्यकर्त्यांची गार्हाणी ऐकून घेतली. या आठवड्यात वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.