बंगळुरू एफसीने चौथ्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील विजयी आगेकूच कायम राखली आहे. घरच्या मैदानावर लागोपाठ दुसरा सामना जिंकताना रविवारी त्यांनी दिल्ली डायनामोज एफसीला ४-१ फरकाने सहज नमविले. सामना येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर झाला. सहा गुणांसह बेंगळुरूने आता गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविले आहे.
बंगळुरूच्या विजयात एरिक पार्तालू याने दोन गोल नोंदविले. त्याने अनुक्रमे २४ व ४५व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखविली. त्यामुळे विश्रांतीच्या ठोक्यास यजमान संघ दोन गोलांनी आघाडीवर होता. ५७व्या मिनिटास लेनी रॉड्रिग्जने यजमान संघाच्या आघाडीत तिसर्या गोलची भर टाकली. पेनल्टी फटक्यावर कालू उचे याने दिल्लीची पिछाडी ८६व्या मिनिटास एका गोलने कमी केली. त्यानंतर लगेच मिकू याने अप्रतिम कौशल्य प्रदर्शित करत ८७व्या मिनिटास बंगळुरूची आघाडी ४-१ अशी भक्कम केली. दिल्लीचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याने काही वेळा दक्षता दाखविली नसती, तर कदाचित बेंगळुरू संघाला आणखी मोठ्या फरकाने विजय नोंदविता आला असता. सामन्यावर यजमान संघाने पूर्ण वर्चस्व राखले. आयएसएल स्पर्धेत या मोसमात पदार्पण करणार्या बेंगळुरूने पहिल्या लढतीत मुंबई सिटी एफसीला २-० असे नमविले होते. दिल्लीने अगोदरच्या लढतीत एफसी पुणे सिटी संघाला ३-२ फरकाने नमवून सुरेख सुरवात केली होती, परंतु नियोजनबद्ध खेळ केलेल्या बंगळुरूविरुद्ध दिल्लीची डाळ शिजली नाही. पराभवामुळे त्यांचे तीन गुण कायम राहिले.