
भारताच्या पी.व्ही सिंधूला हॉंगकॉंग ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ४००,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या तैवानच्या ताई त्झु यिंगने ४४ मिनिटांमध्ये गारद करत विजेतेपदावर नाव कोरले. यिंगने सिंधूचा २१-१८, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच यिंगने आपले वर्चस्व कायम ठेवले होते. पहिल्या गेममध्ये यिंगने ७-३ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने काही गुणांची कमाई करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराच्या वेळी यिंगकडे ११-८ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर सिंधूची गती मंदावल्याने यिंगने पहिला गेम २१-१८ असा जिंकला.
पहिला गेम गमावल्यानंतर दुसर्या गेममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या गेममध्ये सिंधूने यिंगवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सिंधूकडे ११-९ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर यिंगने स्मॅशचा जोरदार मारा केल्याने सिंधू १२-१६ अशी पिछाडीवर पडली. अखेर यिंगने दुसरा गेम २१-१८ अशा फरकाने जिंकत स्पर्धेचे जेतेपद पटकावले.