
‘इंदू सरकार’ हा आपला वादग्रस्त ठरलेला चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर नसून आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला तो चित्रपट आहे. या चित्रपटाची ७५ कहाणी ही काल्पनिक तर त्यातील ३० टक्के घटना या खर्या आहेत, असे मधुर भंडारकर यांनी काल इफ्फीत पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले. गेल्या जुलै महिन्यात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो अत्यंत वादग्रस्त ठरला. लोकांनी चित्रपटाला विनाकारण प्रचंड विरोध केल्याचे ते म्हणाले.
यंदा इफ्फीत भंडारकर यांचा ‘मुंबई मिस्ट’ हा चित्रपट दाखवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पत्रकारांशी संवाद झाला. ‘मुंबई मिस्ट’ ही एक शॉर्ट फिल्म असून ज्येष्ठ नागरिकांशी साधा संवाद साधायलाही मुंबईसारख्या शहरात राहणार्या लोकांकडे सध्या वेळ नाही यावर सदर चित्रपटातून उजेड टाकण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे भंडारकर यांनी यावेळी सांगितले. आधुनिक युगात साधा संवाद साधायलाही लोकांकडे कसा वेळ नाही हे या चित्रपटातून आपण दाखवले असल्याचे भंडारकर म्हणाले.
पद्मावतीला पूर्ण पाठिंबा
भारत देशात विविध जाती धर्माचे लोक राहत असतात. कुणा ना कुणाचा, कुठल्या ना कुठल्या चित्रपटाला विरोध असतो. विरोध करून प्रश्न सुटत नसल्याचे ते म्हणाले. एखादा चित्रपट तयार करण्यासाठी करोडो रु. खर्च येतात. तसेच चित्रपट तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत व कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे एवढे सगळे केल्यानंतर त्या चित्रपटाला विरोध करून तो प्रदर्शित करण्यास अडथळे आणणे योग्य नसल्याचे भंडारकर म्हणाले.