राजकारण सारीपाटावरचं!

0
133

– गौरेश रा. जाधव

भले आज राजकारणातील पात्र वेगळी असतील, डावपेच खेळण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, पण हेतु मात्र एकच आहे… समोरच्याचा पाडाव, मग तो आपला असो किंवा परका. 

कौरवांनी पांडवांना सारीपाटावर हरवून त्यांचं राज्य, त्यांची ईभ्रत आणि द्रौपदीच्या पावित्र्याची लक्त्तरे भर सभेत तोडली तेव्हा एक नव्हे दोन नव्हे तब्बल १० हत्तींचं बळ असणारा भीम, तर वार्‍यालाही दिशा बदलण्यास भाग पाडणारा धनुर्धर अर्जुन पण, आपल्या पत्नीच्या पवित्र देहाची रक्षा करण्यास लुळा ठरला होता. श्रीकृष्णाने वस्त्र पुरवून तिची रक्षा केली असली तरी पुढे याच एका प्रसंगावरून एवढं महाभारत घडलं. यामागे होतं ते मोठं कपट- कुटनीतीचं राजकारण. राजकारण तेव्हाही होतं आणि ते आताही सुरूच आहे. ही एक अशी जखम आहे की ती कशी झाली.. कधी झाली.. सुरुवातीला कोणी घाव घातला.. हे सांगणं कठीणच आहे. पण या जखमेला बर करण्याचं मलम मात्र मिळणं शक्यच नाही असं वाटतंय. ही जखम आता एवढी पसरली आहे की यात आता जीव पडले आहेत, ते जखमेतून घरंगळून खाली पडायला सुरूवात झाली आहे आणि त्या जीवांनी अजून बर्‍याच मानवी शरिरांवर कब्जा करुन शरीरं पोखरून त्यांनाही या जखमेची लागण झालेली आहे.

राजकारण आजही खेळलं जातंय पण ते सारिपाटावर नाही तर समाजातील माणसा-माणसांत खेळलं जातंय. सोंगट्या म्हणून सामान्य जनतेचा वापर केला जातोय आणि पैशाचं आमिष आणि शक्तीचा धाक दाखवून हव्या त्या दिशेने सोंगट्या फिरवल्या जातायत, इथे डाव रचले जातायत मोठे मोठे, माणसातील नातं एका दमडीच्या जोरावर तोडलं जातंय, इथेही कौरव आणि पांडव भाऊ-भाऊ वैरी होवून एकमेकांपुढे उभे राहतात. चौका-चौकात शकुनी मामा टपलेले आहेत. त्याच्या फाशांना बळी पडतात ते साधे आणि भाबडे पांडव. त्यांना मग हवा तसा त्यांचा वापर करुन घेतला जातोय. पितामह म्हणून ज्यांना पुजलं जातंय त्यांच्याकडूनच कधी कधी घात केला जातोय, प्रत्येक दिवस युद्ध स्वतःशी, लढलं जातंय. यात वार करणारी आपली माणसंच असतात. प्रतिवार करावा तरी कसा? अर्जुनाला जसा समोर प्रश्न पडला तसा प्रश्न प्रत्येकाला पडतोय, पण यावेळी मात्र त्याला स्वतःच ठरवायचं आहे वार करावा की नको ते!

भले आज राजकारणातील पात्र वेगळी असतील, डावपेच खेळण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, पण हेतु मात्र एकच आहे… समोरच्याचा पाडाव, मग तो आपला असो किंवा परका. यात काही सैनिक असेही आहेत की त्यांना युद्ध नको शांती हवी. पण अशा सैनिकांना यात थारा दिला जात नाही. अशाना कधीच सेनापतीपद दिलं जात नाही.. तेव्हाही द्रौपदीच्या अब्रुवर जेव्हा घाला घालण्यात आला होता तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र पुरवली होती, पण सध्या मात्र माणुसकीच्या इज्जतीचे लचके राजकरणातली गिधाडं तोडताना दिसतात, मग यावेळी भगवान येतील का वाचवायला की आज असंख्य पांडव असूनदेखील या कुटनीतीच्या वादळात श्वास गुदमरून तडफडत प्राण सोडेल माणुसकी …..??