राजधानी पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत ४५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पणजी शहराबरोबरच कुजिरा शैक्षणिक संकुल, जीएमसी – बांबोळी, गोवा विद्यापीठ – ताळगाव या भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना स्मार्ट सिटी अंतर्गत आखण्यात आली आहे. या योजनेवर साधारण १५० कोटी रुपये खर्च केले जातील. स्मार्ट सिटी अंतर्गत अत्याधुनिक साधनसुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्यात वायफाय, प्रसारण प्रणाली, पर्यावरणीय सेन्सर्स, स्मार्ट ट्रॅफीक, स्मार्ट पार्किंग, नागरिक सुविधा केंद्र आदींची सोय उपलब्ध केली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस, अग्निशामक दल, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर प्रमुख खात्यांना जोडण्यात येणार आहेत.