उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळाडूंना अपील करता यावी यासाठी केंद्रीय क्रीडामंत्रालयाने उत्तेजक द्रव्यविरोधी अपील पथकाची काल निवड केली आहे. या पथकात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व विनय लांबा यांना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्थेच्या (नाडा) पथकात क्रिकेटपटूला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अपील पथकात यंदा निवडण्यात आलेले दोन्ही खेळाडू क्रिकेटपटू असल्याने क्रीडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सेहवाग हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा माजी क्रिकेटपटू असून लांबा यांनी दिल्लीकडून क्रिकेट खेळले आहे तसेच निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
याव्यतिरिक्त उत्तेजक द्रव्य शिस्तपालन समितीत माजी वेटलिफ्टर कुंजाराणी देवी हिला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे उत्तेजक संबंधी नियमाचा भंग केल्याप्रकरणी कुंजाराणीला निलंबित करण्यात आले होते. २००१ साली आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत करण्यात आलेल्या चाचणीत तिच्या नमुन्यांमध्ये स्ट्रायकनिन या प्रतिबंधित द्रव्याचा अंश सापडला होता. त्यामुळे तिला सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. अर्जुन पुरस्कार किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंची स्वच्छ प्रतिमा आवश्यक असताना २०१४ साली या पुरस्काराच्या निवड समितीत कुंजाराणी सारख्या डागाळलेली प्रतिमा असलेल्या खेळाडूला स्थान देण्यात आले होते. कुंजाराणीच्या निवडीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.