वेदांताचा खनिज वाहतुकीचा प्रयत्न फसला

0
147

>> हजारभर ट्रकमालकांचे गेटसमोर धरणे

>> तोडगा काढण्याचा प्रयत्न असफल

कोडली येथील वेदांता कंपनीतर्फे कालपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू करण्याचा केलेला प्रयत्न ट्रक मालकांच्या प्रखर विरोधामुळे फसला. ट्रकमालक संघनेने केलेल्या आवाहनानुसार सुमारे हजारभर ट्रकमालकांनी कंपनीच्या गेटसमोर धरणे धरून खनिज वाहतूक करण्यास मज्जाव केला. यावेळी धारबांदोड्याचे मामलेदार लक्ष्मीकांत कुर्ट्टीकर यांनी कपंनीचे अधिकारी व ट्रकमालक यांची बैठक घेऊन तोडग्यासाठी केलेल्या प्रयत्नांनाही यश आले नाही. यानंतर वाहतुकीसाठी गेलेल्या ९ पैकी ४ ट्रक मालकांनी संध्याकाळी आपले ट्रक स्वखुषीने बाहेर काढले. दरम्यान, आज कंपनी कोणत्याही स्थितीत बाहेरचे ट्रक मागवून वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे परिसरात जमावबंदी लागू करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केल्याचे समजते.

खनिज वाहतुकीचा दर १२.५० रुपये व डिझेल ५२ रुपये करावे या मागणीसाठी ट्रकमालक व कंपनीमध्ये संघर्ष सुरू आहे. कंपनीने पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक करण्यासाठी काल खास पोलीस संरक्षण मागविले होते. सकाळी ७ वा. पासून सुमारे १०० पोलीस गेटसमोर तैनात करण्यात आले होते. परिसरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून धारबांदोड्याचे मामलेदार लक्ष्मीकांत कुर्ट्टीकर व निरीक्षक रवींद्र देसाई यांनी कंपनीचे अधिकारी व ट्रकमालकांच्या शिष्ट मंडळाची बैठक घेतली. मात्र, बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नाही. स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांनीही ट्रकमालकांची भेट घेऊन चर्चा केली.
कंपनीने पोलीस संरक्षणात वाहतूक करण्यासाठी मागवलेले ९ ट्रक काल खाणीवर होते. त्याची माहिती मिळताच उपस्थित ट्रक मालकांनी वाहतुकीसाठी आलेल्या ९ ट्रक मालकांना विनंती करून ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीचे अधिकारी जोजेफ कुएलो यांनी रिकामे ट्रक माघारी नेण्यास मज्जाव केला. परंतु, संध्याकाळपर्यंत ४ रिकामे ट्रक स्वखुषीने बाहेर काढण्यात आले.बालाजी ऊर्फ विनायक गावस यांनी यासंदर्भात बोलताना सरकारने यासंबंधी ट्रकमालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. ट्रकमालक दर परवडत नसल्याने संघटित झाले असून आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच संदीप पाऊसकर यांनी कंपनीतर्फे परिसरात १४४ कलम लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र, ट्रकमालक आपल्या मागण्यांवर ठाम असून कंपनीने जबरदस्तीने वाहतूक सुरू केल्यास परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगितले. ट्रकमालकांचे शिष्टमंडळ, मामलेदार व पोलीस निरीक्षक यांच्यात झालेल्या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जोजेफ कुएलो यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाण कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करून दर जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा दरवाढ करणे शक्य नसल्याचे सांगितले.