कॉंग्रेसने अन्याय केल्याची आलेक्स सिक्वेरांना खंत

0
93

कॉँग्रेस पक्षामुळे राजकीय क्षेत्रात कारकिर्द घडविण्याची संधी प्राप्त झाली. कॉँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यात योगदान देण्याच्या उद्देशाने दोन्ही जिल्हा समित्यांना कार्यालये उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, माझ्या विरोधात पक्षातील काही नेत्यांनी कृती करून पक्षातून निलंबित करण्याचा बनावट फतवा काढला. तसेच फेब्रुवारी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावेळी आपल्यावरच अन्याय केला, अशी खंत माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काल व्यक्त केली.

गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीच्या दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा समित्यांसाठी दोन कार्यालये उपलब्ध करणारे माजी मंत्री सिक्वेरा यांचा काल सोमवारी गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी मंत्री सिक्वेरा ही खंत व्यक्त केली. यावेळी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक, माजी आमदार डॉम्निक फर्नांडिस, सेवा दलाचे शंकर किर्लपालकर, उत्तर गोवा अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सुभाष फळदेसाई, महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांची उपस्थिती होती.

कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचा पक्षसंघटन मजबूत करण्याच्या कार्यासाठी योग्य वापर झाला पाहिजे. जिल्हा समित्यांच्या तीन महिन्यांनी होणार्‍या बैठकांना ९० टक्के उपस्थिती लाभावी यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. दक्षिण गोवा कार्यालय कार्यरत झालेले आहे. उत्तर गोवा कार्यालयाचे लवकरच उद्घाटन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी सांगितले.

आलेक्स सिक्वेरा यांनी दक्षिण गोवा कार्यालयासाठी ६० लाख तर उत्तर गोवा जिल्हा कार्यालयासाठी ७० लाख रूपये खर्च केले आहेत, अशी माहिती सुभाष फळदेसाई यांनी दिली. यावेळी प्रतापसिंह राणे, रवी नाईक, एदुआर्द फालेरो, विरोधी पक्षनेते कवळेकर यांची भाषणे झाली.