जीपीएल कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार भरपाई

0
109

>> औषधे कमी आढळल्याचा ठपका

गोवा अँटिबायोटीक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (जीएपीएल) च्या मडगाव येथील मेडीसेंटरच्या सप्टेंबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये २६,९०५ रुपयांचा औषधसाठा कमी आढळून आला असून या रक्कमेची वसुली कर्मचार्‍यांच्या तीन महिन्यांच्या पगारातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जीएपीएल कंपनीने सप्टेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात केलेल्या तपासणीमध्ये जीएपीएलच्या मडगाव येथील मेडीसेंटरमध्ये औषधसाठा कमी असल्याचे आढळून आले आहे. यासंबंधीच्या चौकशीमध्ये कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे ही गोष्ट घडल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे कंपनीला आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कमी असलेल्या औषध साठ्याची रक्कम कर्मचार्‍यांच्या पगारातून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधसाठा कमी प्रकरणात एखादा कर्मचारी गैरकृत्यात गुंतलेला असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मडगाव मेडीसेंटरमधील एप्रिल ते ऑगस्ट २०१७ या पाच महिन्यांच्या काळातील औषध साठ्याची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी २६,९०५ रुपयांचा औषधसाठा कमी आढळून आला होता. या रक्कमेची वसुली या सेंटरमधील कर्मचार्‍यांच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या पगारातून केली जाणार आहे. कंपनीने १७ ऑक्टोबरला याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.