
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ९ हजार एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वांत वेगवान खेळाडू ठरला. कोहलीने १९४व्या डावात नऊ हजारी होण्याचा मान मिळविला. एबी डीव्हिलियर्सला यासाठी २०५ डाव खेळावे लागले होते. सौरव गांगुलीने २२८ डावांत तर सचिन तेंडुलकरने २३५ डावांत ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
कोहलीपूर्वी केवळ पाच भारतीयांना नऊ हजारांपेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. कोहलीने भारताची फलंदाजी सुरू असताना ३७व्या षटकात ग्रँडहोमचा चेंडू चौकाराला पाठवत हा टप्पा ओलांडला. कोहलीने यानंतर आपले ३२वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. केवळ ९६ चेंडूंत शतकी वेस ओलांडल्यानंतर कोहली वैयक्तिक ११३ धावांवर बाद झाला. मागील वर्षी महेंद्रसिंग धोनीने नऊ हजारी होण्याचा मान मिळविला होता. याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली व मोहम्मद अझरुद्दीन यांनीदेखील नऊ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोहलीने आपल्या शिरपेचात अजून एक तुरा खोवताना आपल्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या ४९ केली. त्याने राहुल द्रविड (४८) याला मागे टाकले.
कोहलीने आपल्या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत एका स्थानाने प्रगती करत तिसावे स्थान मिळविले. कोहलीने न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगला (१५,३१९ धावा) मागे टाकले. कोहलीच्या खात्यात आता १५४२७ आंतरराष्ट्रीय धावांची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऍडम गिलख्रिस्ट (१५४६१) व मोहम्मद अझरुद्दीन (१५,५९३) यांना मागे टाकण्यासाठी कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.