श्रीकांतला फ्रेंच ओपनचा किताब

0
108
India's Srikanth Kidambi competes against Japan's Kenta Nishimoto during their men's singles final match at the French Open Badminton tournament at the Coubertin Stadium in Paris on October 29, 2017. / AFP PHOTO / Thomas SAMSON

यंदाच्या मोसमातील आपली स्वप्नवत वाटचाल कायम ठेवताना भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने काल जपानच्या केंटा निशिमोटो याला २१-१४. २१-१३ असे पराजित करत फ्रेंच ओपन सुपर सीरिज आपल्या नावे केली. सुपर सीरिजची हॅट्‌ट्रिक साजरी केल्यानंतर श्रीकांतने वर्तमान मोसमातील आपला चौथा किताब काल पटकावला. या मोसमातील पाचव्या सुपर सीरिज अंतिम फेरीत खेळताना श्रीकांतने सलग दुसर्‍या आठवड्यात अजिंक्यपदाला गवसणी घातली. मागील आठवड्यात त्याने ओडेन्समध्ये डेन्मार्क ओपन किताबावर नाव कोरले होते.

श्रीकांतचा भन्नाट फॉर्म पाहता अंतिम सामना एकतर्फी होण्याची अपेक्षा होती. सुरुवातीचे काही गुण वगळता ही अपेक्षा खरी ठरली. पहिल्या गेममध्ये निशिमोटो याने चांगली सुरुवात करताना ९-५ अशी चार गुणांची आघाडी घेतली. या आघाडीमध्ये वाढ करून श्रीकांतवर दबाव टाकण्याची गरज असताना निशिमोटो याचा खेळ खालावला व श्रीकांतने ९-९ अशी बरोबरी साधली. यानंतर श्रीकांतने मागे वळून न पाहता आपले सरस तंत्र व चपळतेच्या बळावर १४-१० अशी आघाडी घेतली. निशिमोटोेने यानंतर काही गुण घेत १५-१४ पर्यंत अंतर कमी केले. श्रीकांतने आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपला सर्व अनुभव पणाला लावत सलग सहा गुण घेत पहिला गेम खिशात घातला. पहिल्या गेमच्या प्रारंभी केलेल्या चुका टाळताना श्रीकांतने दुसर्‍या गेममध्ये १०-२ अशी मोठी आघाडी घेतली. निशिमोटोने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न करत गुणांचे अंतर १३-८ असे कमी केले. परंतु. मोक्याच्या क्षणी श्रीकांतने आपला खेळ उंचावत दुसरा गेमही आरामात जिंकला. त्याची आक्रमक सर्व्हिस, नेट जवळचा सुरेख खेळ, सुंदर रिटर्न, बॅकहँड, ङ्गोरहँडचा खुबीने केलेला वापर, क्रॉस कोर्टचे अप्रतिम ङ्गटके सारे काही डोळ्याचे पारणे ङ्गेडणारे होते.