गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने काल बुधवारी जाहीर केला असून ९ आणि १४ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान व १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी काल बुधवारपासूनच आचारसंहिता लागू झाल्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अचलकुमार जोती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुजरात विधानसभेचा कार्यकाळ २२ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे. दोन टप्प्यात मतदान होणार असून ४ कोटी ३३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. १०२ मतदान केंद्रावरील सर्व कर्मचारी या महिला असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक उमेदवाराला प्रचारावर २८ लाख रुपयांपर्यंतच खर्च करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर ९ डिसेंबर रोजी मतदान होईल. यामध्ये १९ जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून यात १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.