बीसीसीआयला ८५० कोटींचा भुर्दंड

0
74

आयपीएलमधील माजी फ्रेंचायझी कोची टस्कर्सला ८५० कोटींची भरपाई बीसीसीआयला द्यावी लागणार आहे. कोचीचा संघ काही आर्थिक बाबींसाठी आवश्यक असलेली १५६ कोटीची बँक हमी सादर करू शकला नव्हता. ज्यामुळे त्यांच्याशी करण्यात आलेला करार बीसीसीआयने रद्द केला होता तसेच या संघाला आयपीएलमधून निलंबित केले होते.

कोची टस्कर्सने बीसीसीआयविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका निकालात काढताना न्यायालयाने कोची टस्कर्सच्या बाजूने निकाल दिला होता. करार रद्द करण्याचा निर्णय हा बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी घेतला होता. बीसीसीआयचे बहुतांश पदाधिकारी हे या निर्णयाच्या विरोधात होते मात्र तरीही मनोहर यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय आता बीसीसीआयला महागात पडला आहे. बीसीसीआयने आता कोची टस्कर्सबरोबर तडजोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तडजोड जरी झाली तरी त्या संघाला कमीत कमी ६०० कोटी रुपये द्यावेच लागतील. कराराचा भंग केल्याप्रकरणी बीसीसीआय आणि कोची टस्कर्स यांच्यात सुरु असलेल्या न्यायालयीन वादात कोचीच्या प्रशासनाची बाजू २०१५ साली न्यायालयाने ग्राह्य धरली. यानंतर आर.सी. लाहोटी समितीने बीसीसीआयला कोची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसान भरपाई आणि वेळेत रक्कम न दिल्यास १८ टक्के व्याज इतका दंड ठोठावला होता. गेल्या दोन वर्षांपासून बीसीसीआय या प्रकरणी चालढकल करण्याचा प्रयत्न करत होती. आमच्यासमोरील सर्व कायदेशीर पर्याय आता संपलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेनंतर बीसीसीआय रक्कम फेडीप्रकरणी निर्णय घेण्यात येईल, असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले आहे.