युकी १४२व्या स्थानी; घसरणीसह सानिया नववी

0
79

पुरुष एकेरीतील भारताचा आघाडीचा खेळाडू युकी भांब्री याने काल जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत १४२वा क्रमांक मिळविला आहे. मागील आठवड्यात तो १४६व्या स्थानी होता. श्रीराम बालाजी याने चार स्थानांची सुधारणा करत ३५२व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. रामकुमार रामनाथन व प्रज्ञेश गुणेश्‍वरन यांना मात्र नुकसान सोसावे लागले आहे, रामनाथन १५०व्या (-१) तर प्रज्ञेश २२९व्या (-२) स्थानी आहे. दुहेरीत दिविज शरण याने १५ क्रमांकांची मोठी उडी घेत ५१वे स्थान मिळविले आहे. शंभराव्या स्थानावरून जीवन नेदुचेझियान ९६व्या स्थानी आला आहे. रोहन बोपण्णा (-१,१७वे स्थान) व पूरव राजा (-१, ६०वे स्थान) यांना तोटा झाला आहे.

डब्ल्यूटीए क्रमवारीत भारताची आघाडीची खेळाडू अंकिता रैनाने २७६वे स्थान (+ ३), करमन थंडी (+ ६, ३१२ वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. दुहेरीत मात्र सानिया मिर्झा, प्रार्थना ठोंबरे व अंकिता रैना यांना अनुक्रमे एक, सात व चार स्थानांचा फटका बसला आहे. सानिया नवव्या, प्रार्थना १३२व्या तर अंकिता रैना १८८व्या स्थानी आहे.

‘टॉप १०’ खेळाडूंचा विचार केल्यास स्पेनचा राफेल नदाल, स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर व ब्रिटनचा अँडी मरे पहिल्या तीन स्थानांवर कायम आहेत. अन्य कोणताही बदल अव्वल दहा खेळाडूंत झालेला नाही. ‘टॉप १०’ बाहेरील प्रमुख खेळाडूंचा विचार केल्यास ज्यो विल्फ्रेड त्सोंगा याने अँटवर्प येथे झालेली युरोपियन ओपन स्पर्धा जिंकून २०५ गुणांची कमाई केली. या गुणांसह त्याने दोन स्थाने वर सरकताना १५वा क्रमांक मिळविला. पुरुष दुहेरीत बॉब व माईक या ब्रायन बंधूंनी एका स्थानाची सुधारणा करत सहाव्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे.

डब्ल्यूटीेए क्रमवारीत ‘अव्वल १०’मध्ये काही बदल झाले आहेत. तीन स्थानांच्या घसरणीसह स्वेतलाना कुझनेत्सोवा ११व्या स्थानी पोहोचली आहे. फ्रान्सच्या क्रिस्तिना म्लेदेनोविचने ३ क्रमांकांची उडी घेत दहावा क्रमांक मिळविला आहे.