राहुल गांधी अध्यक्ष झाल्यास पक्षाला उभारी ः शांताराम नाईक

0
71

कॉँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी तमाम कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला निश्‍चित आणखीन गती येऊन पक्षाला उभारी येईल अशी प्रतिक्रिया गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी व्यक्त केली.
कॉँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीची कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याचे संकेत दिले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी नव्या दमाच्या तडफदार नेत्याची पक्षाला गरज आहे. राहुल गांधी यांनी गेली कित्येक वर्षे संघटनात्मक कार्य योग्य पद्धतीने केले आहे. तसेच राहुल गांधींमुळे युवा वर्ग कॉँग्रेस पक्षाशी जोडला जाणार आहे. गोवा प्रदेश समिती राहुल गांधी यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

कॉंग्रेस पक्षाची धुरा हातात घेण्यासाठी राहुल गांधी यांच्यासाठी आत्ताच योग्य वेळ आहे. राहुलमध्ये कॉंग्रेस पक्षाला आक्रमकपणे पुढे नेण्याची ताकद आहे. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सरकारच्या बाहेर राहून कार्य केलेले आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.
देशातील बहुतेक राज्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा आहे. बहुतेक राज्यांनी तशा आशयाचे ठराव संमत करून राष्ट्रीय कॉँग्रेस समितीकडे पाठविले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस पक्षसंघटन आणखीन मजबूत होऊ शकते, असे कॉँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी सांगितले.