अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी मलेशिया संघाचा २-१ ने पराभव करीत भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने तिसर्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. ‘सुपर फोर’ फेरीत भारताने मलेशियाला एकतर्फी लढतीत ६-२ असे नमविले होते. परंतु, याच दोन संघांमधील अंतिम फेरीचा सामना अटीतटीचा झाला. शेवटच्या सत्रात भारताने मलेशियाचे आक्रमण थोपवून धरताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
रमणदीप सिंग (तिसरे मिनिट) व ललित उपाध्याय (२९वे मिनिट) यांनी भारताकडून गोल झळकावले. शाहरिल सबा (५०वे मिनिट) याने मलेशियाचा एकमेव गोल केला. भारताचा आकाशदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून भारताने आक्रमकतेची कास धरली. तिसर्या मिनिटाला एस. व्ही. सुनील आणि रमणदीप सिंह यांनी रचलेल्या सुरेख चालीचे रुपांतर गोलमध्ये झाले. या आघाडीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने पहिल्या सत्रात आपली आघाडी कायम राखली. दुसर्या सत्रात मलेशियाने आपल्या खेळात सुधारणा केली. आक्रमक चाली रचत मलेशियाच्या आघाडीच्या खेळाडूंनी भारतीय बचावङ्गळीवर आक्रमणे केली. मात्र भारताचा बचाव भेदणे त्यांना शक्य झाले नाही. भारतालाही दुसर्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र मलेशियाच्या गोलरक्षकाने उत्तम बचाव करत आघाडी दुप्पट करण्याचा भारताला प्रयत्न अयशस्वी केला.
दुसरे सत्र संपत असताना भारताच्या आघाडीच्या फळीतील गुरजंत सिंहने दिलेल्या पासवर २९ व्या मिनिटाला ललित उपाध्यायने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवत भारताची आघाडी २-० ने फुगवली. तिसर्या सत्रात एकाही गोलची नोंद झाली नाही. या सत्रात समन्वयाच्या अभावामुळे भारताला संधींचे सोने करता आले नाही.
अखेरच्या सत्रात मात्र मलेशियाने भारतावर प्रचंड दडपण टाकले. या आक्रमक खेळाचा फयदा घेत ५० व्या मिनिटाला शरील साबाने मलेशियाचा पहिला गोल करत भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. मलेशियाकडून झालेल्या या आक्रमणामुळे भारतीय संघ अखेरच्या मिनिटांमध्ये बॅकफूटवर ढकलला गेला होता. मलेशियाचा संघ बरोबरी साधून सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत खेचेल असे वातावरण निर्माण झालेले असतानाच गोलरक्षक आकाश चिकटे व बचावफळीने शेवटची दीड मिनिटे सर्वोत्तम बचाव करत विजय नक्की केला. तिसर्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पाकिस्तानने द. कोरियाला ६-३ असे हरविले.
भारतीय संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेची आठव्यांदा अंतिम फेरी गाठली होती. भारताने २००३ आणि २००७ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे, तर १९८२, १९८५, १९८९, १९९४ आणि २०१३ मध्ये भारताला या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान, आठवडाभरात भारताने पाकिस्तानला दोनदा हरविले. गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानला ३-१ ने हरविले होते, तर सुपर फोर फेरीच्या सामन्यात भारताने पाकला ४-० ने पराभूत केले होते.