विष्णू वाघांविरोधात गुन्हा नोंद

0
131

>> पुस्तकात महिलांबद्दल अश्‍लील भाषा

प्रसिद्ध साहित्यिक तथा माजी सभापती विष्णू सुर्या वाघ यांनी त्यांच्या ‘सुधीर सूक्त’ या पुस्तकात महिलांबद्दल अश्‍लील शब्दाचा वापर केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी श्री. वाघ यांच्यासह वळवई येथील अपुरबाय या पुस्तक प्रकाशन संस्थेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे २०१३ साली प्रकाशित झालेले हे वादग्रस्त पुस्तक काही दिवसांपूर्वी वरील पुस्तक राज्य साहित्यिक पुरस्काराच्या शर्यतीत होते.
‘सुधीर सूक्त’ या पुस्तकात महिलांविषयी अश्‍लील शब्द वापरल्याची तक्रार ‘बायलांचो एकवोट’ या समाजसेवी संस्थेच्या आवडा व्हिएगश यांनी लेखक विष्णू वाघ व वळवई येथील अपुरबाय प्रकाशनविरुद्ध पोलिसांत केली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी काल लेखक विष्णू वाघ व पुस्तकाच्या प्रकाशक हेमा नाईक यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुस्तकात महिलांबद्दल अश्‍लील भाषा वापरल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासकाम सुरू असल्याचे श्री. गावस यांनी सांगितले. भा. दं. सं. कलम २९३ व २९२ कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपनिरीक्षक अजित उमर्ये या प्रकरणी तपास करीत आहेत.
दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशन हेमा नाईक यांनी आपल्याला गुन्हा नोंद झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. आपल्याला गुन्ह्याविषयी कळवण्यात आले नसल्याचे सांगितले.