>> शेती-बागायतींचे १ कोटीचे नुकसान
खोतीगाव पंचायत क्षेत्रात शनिवारी सायंकाळी तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचायत क्षेत्रातील सुमारे २०० शेतकर्यांच्या शेती-बागायतींचे अंदाजे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज काणकोण विभागीय कृषी खात्याने व्यक्त केला आहे. त्यात प्रगतशील शेतकरी तथा काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत यांच्या सुपारी लागवडीचे प्रचंड नुकसान झाले असून एक युवा शेतकरी प्रसाद वेळीप यांच्या लागवडीची प्रचंड हानी झाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसामुळे २ ऑक्टोबर २००९ साली आलेल्या पुराच्या आठवणी जाग्या झाल्या.
खोतीगाव पंचायत क्षेत्रातील कुसके, नडके, पणसुलेमळ, तामणामळ व येडा या भागात जोरदार पाऊस पडल्याने अचानक पाण्याची पातळी वाढून पाणी शेतात तसेच बागायतीत घुसले. या पाण्यामुळे भातशेती, केळी, सुपारी, नारळाची झाडे तसेच कुंपणे, पंप वाहून गेले. ओहोळाशेजारी असलेल्या शेतकर्यांना याचा जास्त फटका बसला. अचानक वाढलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तामणामळ, येडा, कुसके गावात भीतीग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. अतिवृष्टीमुळे ओहोळात व आजूबाजूला पाणी भरल्याने पणसुलेमळ या वाड्यावरील काही शेतकरी पलीकडे अडकून पडले होते. घराकडे परतताना सगळ्याच वाटा बंद झाल्याने त्यांच्या मदतीसाठी काणकोण अग्निशामक दलाचे जवान धावून गेले. रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते. परंतु रात्री १० नंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे लोकांची सुटका झाल्याचे खोतीगावचे एक शेतकरी शांताराम देसाई यांनी सांगितले.
खोतीगावात पावसाच्या प्रकोपाची माहिती मिळताच काणकोणचे उपजिल्हाधिकारी शंकर गावकर, मामलेदार रमेश गावकर, काणकोण विभागीय कृषी अधिकारी चंद्रहास देसाई यांनी काल नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. कृषी अधिकारी चंद्राहास देसाई, सहाय्यक कृषी अधिकारी महेंद्र पागी व सहाय्यक कृषी अधिकारी संगीता वेळीप यांच्या अधिकाराखाली तीन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम या अधिकार्यांनी सुरू केले आहे. ३० हेक्टरातील शेती लागवडीचे नुकसान झाले आहे.