कांगारूंची मालिकेत बरोबरी

0
92
Australia's Jason Behrendorff bowls during the second T20 match of the India-Australia cricket series at the Assam Cricket Association stadium in Guwahati on October 10, 2017. / AFP PHOTO / Dibyangshu SARKAR / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

जेसन बेहरेनडॉर्फने भेदक मारा करत घेतलेल्या चार बळींच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताला ८ गडी व २७ चेंडू राखून पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले ११९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १५.३ षटकांत २ गडी गमावून गाठले.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार वॉर्नर याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेहरनडॉर्फने रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली व मनीष पांडे यांना तंबूचा रस्ता दाखवून कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. ही चौकडी बाद झाली तेव्हा टीम इंडिया ४ बाद २७ अशी चाचपडत होती. यानंतर केदार जाधव (२७), हार्दिक पंड्या (२५) व कुलदीप यादव (१६) यांनी धोड्याफार धावा जमवल्याने भारताला शतकी वेस ओलांडणे शक्य झाले. कांगारूंकडून बेहरनडॉर्फने २१ धावांत सर्वाधिक ४ गडी बाद केले. किरकोळ लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंचे दोन्ही सलामीवीर १३ धावांत परतले. परंतु, यानंतर मोझेस हेन्रिक्सने ४६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६२ व ट्रेव्हिस हेडने ३४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा करत कांगारूंचा विजय साकार केला. भारताकडून भुवनेश्‍वर कुमार व जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ गडी बाद केला. मालिकेतील तिसरा व शेवटचा टी-२० सामना हैदराबादमध्ये १३ ऑक्टोबर रोजी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक
भारत ः २० षटकांत सर्वबाद ११८ (रोहित ८, शिखर २, विराट ०, पांडे ६, जाधव २७, धोनी १३, पंड्या २५, भुवनेश्‍वर १, कुलदीप १६, बुमराह ७, चहल नाबाद ३, अवांतर १०, बेहरेनडॉर्फ २१-४, कुल्टर नाईल २३-१, टाय ३०-१, झंपा १९-२, स्टोईनिस २०-१) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया १५.३ षटकांत २ बाद १२२ (फिंच ८, वॉर्नर २, हेन्रिक्स नाबाद ६२, हेड नाबाद ४८, अवांतर २, भुवनेश्‍वर ९-१, बुमराह २५-१, पंड्या १३-०, कुलदीप ४६-०, चहल २९-०)