>> डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथच्या पाच बळींनंतर फलंदाजांची हाराकिरी
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेचा संघ पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावात पाकिस्तानने नाममात्र ३ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसर्या डावात लंकेची ४ बाद ६९ अशी दयनीय स्थिती झाली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ४१९ धावांना उत्तर देताना पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ४२२ धावांपर्यंत मजल मारली. पदार्पणवीर हॅरिस सोहेल (७६) याने तळातील फलंदाजांना हाताशी धरून पाकला आघाडीवर नेले. श्रीलंकेकडून रंगना हेराथने प्रभावी मारा करताना ९३ धावांत ५ गडी बाद केले. डावात पाच बळी घेण्याची त्याची ही ३२वी वेळ आहे. सुरंगा लकमल व नुवान प्रदीप यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. दिलरुवान परेराने एकाला माघारी घाडले. पाकचा डाव संपल्यानंतर ४० षटके खेळताना किमान बळी गमावण्याचे लक्ष्य असताना लंकेच्या आघाडी फळीतील फलंदाजांनी पाकिस्तानच्या फिरकीपटूंसमोर लोटांगण घातले. लेग स्पिन गोलंदाज यासिर शाहने २ तर कामचलाऊ गोलंदाज असद शफिक व हॅरिस सोहेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद करत लंकेला बॅकफूटवर ढकलले. आज सामन्याचा शेवटचा दिवस असून सामना वाचविण्यासाठी लंकेला किमान दोन सत्रे खेळून काढावी लागतील. तर विजयासाठी पाकला लंकेचा डाव मर्यादित ठेवावा लागेल.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद ४१९, पाकिस्तान पहिला डाव ः (४ बाद २६६ वरून) ः अझर झे. सदीरा गो. हेराथ ८५, सोहेल झे. लकमल गो. प्रदीप ७६, सर्फराज त्रि. गो. लकमल १३, आमिर पायचीत गो. लकमल ४, यासिर झे. थिरिमाने गो. हेराथ ८, हसन यष्टिचीत डिकवेला गो. हेराथ २९, अब्बास नाबाद १, अवांतर २४, एकूण १६२.३ षटकांत सर्वबाद ४२२
गोलंदाजी ः लकमल ४२-२, प्रदीप ७७-२, दिलरुवान ९२-१, संदाकन ९८-०, हेराथ ९३-५, करुणारत्ने ६-०
श्रीलंका दुसरा डाव ः करुणारत्ने झे. मसूद गो. यासिर १०, कौशल पायचीत गो. सोहेल २५, थिरिमाने झे. सर्फराज गो. शफिक ७, कुशल नाबाद १६, चंदीमल झे. शफिक गो. यासिर २, लकमल नाबाद २, अवांतर २, एकूण ४० षटकांत ४ बाद ६९
गोलंदाजी ः आमिर १४-०, अब्बास ७-०, यासिर २५-२, हसन ८-०, शफिक ७-१, सोहेल ७-१