आजच्या जमान्यात लोकसेवा मानून वैद्यकीय सेवा करणारे डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी समाजसेवेचे व्रत निरंतरपणे चालू ठेवून एक आदर्श घालून दिला असून अशा समाजसेवी डॉक्टरांचा सन्मान सरकारतर्फे होण्याची गरज आहे. डॉ. हेगडे यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करीत राहावे असे उद्गार कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी काढले.
डॉ. व्यंकटेश पांडुरंग हेगडे षष्ठब्दिपूर्तीनिमित्त रवींद्र भवनात सत्कार समितीतर्फे समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला कृषीमंत्री श्री. सरदेसाई मुख्य अतिथी, सभापती डॉ. प्रमोद सावंत, आमदार दिगंबर कामत सन्माननिय अतिथी होते. सत्कार समितीचे अध्यक्ष प्रवास नायक, उपाध्यक्ष भाई नायक, सत्कारमूर्ती डॉ. व्यंकटेश हेगडे, त्यांच्या पत्नी सौ. संगीता हेगडे उपस्थित होत्या. मंत्री सरदेसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पमाला व भेटवस्तू देवून हेगडे यांचा सन्मान केला तर सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते मानपत्र बहाल केले. सौ. उषा सरदेसाई यांनी सौ. संगीता हेगडे यांची खणानारळाने ओटी भरली. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी शुभेच्छा पाठविल्या होत्या. त्यांनी पाठविलेली शाल श्री दिगंबर कामत यांच्या हस्ते हेगडे यांना देण्यात आली.
आज युवा पिढीची वाटचाल भलत्याच दिशेने सुरू असताना सरळ मार्गावर आणण्यासाठी डॉ. हेगडे यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज आहे. मन:शांती, समाधान मिळवण्यासाठी आध्यात्मिक गुरुची आवश्यकता असते. आपणही त्याचा अनुभव घेतला आहे असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. वैद्यकीय व्यवसाय हा गरीबांना मदत करण्यासाठी आहे याची विस्मृती डॉ. हेगडे यांनी पडू दिली नाही. आध्यात्मिक कार्यातून त्यांनी गोव्यात क्रांती केली असून श्री श्री रविशंकर या गुरुंच्या हृदयांत मानाचे स्थान मिळविले आहे असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून डॉ. हेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना आज मन आनंदाने भरून आल्याचे सांगितले. बालपणात अनेक आव्हाने होती. त्या आव्हानांना तोंड देत धैर्याने जीवनात मार्गक्रमण केले. समाजातील प्रत्येक घटकाने वेळ मिळेल तेव्हा सेवा करावी असे ते म्हणाले. स्वागत प्रवास नायक यांनी केले. नवनाथ खांडेपारकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन अनिल पै व पूर्वा गुडे यांनी केले. शेवटी सचिव समीर कुंकळ्येकर यांनी आभार मानले. त्यानंतर व्यंकटेश व संगीता हेगडे यांनी नटसम्राट व संगीत सौभद्र नाटकातील प्रवेश सादर केले.