
लष्करे तोयबाचा एक म्होरक्या व अलीकडेच झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अबू इस्माईल सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाला. इस्माईलबरोबरच अन्य एक दहशतवादीही या कारवाईत ठार झाला. नौगाम येथे सुरक्षा दलांशी उडालेल्या चकमकीत या दोघांचा खात्मा झाला.
अबू ईस्माईल हा मूळ पाकिस्तानी नागरीक असल्याचे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास अधिकार्यांना आढळून आले होते. या दहशतवादी हल्ल्यात सहा महिलांसह ७ भाविक मृत्यूमुखी पडले होते. तसेच अन्य १९ भाविक जखमी झाले होते. त्यानंतर या हल्ल्याचे तपासकाम सुरू झाल्यानंतर ईस्माईल याचा या हल्ल्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने सुरक्षा दलांनी त्याच्या शोधासाठी खास मोहीम सुरू केली होती.
गुप्तचर विभागाला मिळालेल्या सांकेतिक भाषेतील संवादाच्या आधारे ईस्माईल याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे दिसून आले होते. अलीकडील काही दिवसांत सुरक्षा दलांच्या कारवायांना चांगले यश आले आहे. लष्करे तोयबाचे अनेक दहशतवादी या कारवायांत ठार झाले आहेत. त्या कारवायांत ठार झालेल्यांत बशीर, अबू दुजाना यांचा समावेश आहे.