>> करमल घाटातील १३ हजार झाडांवर कुर्हाड
गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७ चे चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. मोठे वनक्षेत्र असलेल्या गोव्यात या रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापावी लागणार असून एका काणकोण तालुक्यातील करमलघाट परिसरातील तब्बल १३ हजार झाडे ह्या रस्ता रुंदीकरणासाठी कापून टाकावी लागणार आहेत. ही झाडे वन खात्याच्या पिसोणे क्षेत्रातील आहेत.
केपें तालुक्यातील पाडी व काणकोण तालुक्यातील गुळेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग १७वर मोठमोठी वळणे असून हा संपूर्ण रस्ताही अगदीच अरुंद असा आहे. अरुंद रस्ता व निमुळती वळणे ह्यामुळे पोळे ते गुळे ह्या दरम्यानचा हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या अत्यंत धोक्याचा ठरला आहे. मात्र, आता लवकरच या रस्त्याच्या चौपदरी व सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे.
नेमकी किती झाडे ह्या रस्ता रुंदीकरणासाठी कापून टाकावी लागणार आहेत याचा अहवाल तयार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तो अहवाल पर्यावरण मंत्रालयाला पाठवणार आहे. किती मोठे वृक्ष, किती मध्यम आकाराचे व किती छोटे वृक्ष कापावे लागणार आहेत त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले. ह्या वनक्षेत्रात ‘माट्टी’ (राज्य वृक्ष), किंदळ व निलगिरीची झाडे मोठ्या प्रमाणात असून ती कापावी लागणार आहेत. सध्याच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ह्या झाडांच्या एकूण किमतीपेक्षा दुप्पट पैसे वन खात्याला फेडणार आहे.
वृक्षतोडीऐवजी बोगद्यांची मागणी
वन खात्याच्या नियमानुसार कापण्यात आलेल्या दर एका झाडामागे दोन नवी झाडे लावण्यात येणार आहेत. दरम्यान, काही पर्यावरणवाद्यानी एवढ्या मोठ्या संख्येने झाडे कापण्यापेक्षा जेथे शक्य आहे तेथे बोगदे खोदण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.