चोडण-रायबंदर जलमार्गावर 15 दिवसांत रो-रो फेरीसेवा

0
4

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

चोडण ते रायबंदर या जल मार्गावर रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) फेरी सेवा येत्या 15 दिवसांत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिकांसाठी रो-रो फेरीसेवेसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तर, पर्यटकांकडून शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, दुचाकी वाहनांना माफक शुल्क लागू करण्यावर विचार केला जात आहे, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.

राज्यात प्रथमच चोडण ते रायबंदर या जलमार्गावर रो-रो फेरीसेवा सुरू केली जाणार आहे. या फेरीसेवेच्या शुभारंभाची तारीख निश्चित केलेली नाही. तरी, पंधरा दिवसांत या फेरीसेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. नदी परिवहन खात्याने दोन रो-रो फेरी वाहतुकीसाठी तयार केल्या आहेत. या रो-रो फेरीबोटीची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

नदी परिवहन खात्याकडून जलमार्गावरील फेरीबोट सेवेसाठी सुमारे 76 कोटी रुपये खर्च केले जातात. खात्याला केवळ 52 लाखांचा महसूल मिळतो. दोन्ही रो-रो फेरीबोटी चोडण ते रायबंदर या जलमार्गावर चालविण्यात येणार असून जुन्या फेरीबोटी अन्य जलमार्गावर वळविण्यात येणार आहेत. रो-रो फेरीबोटीमुळे खर्चात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे रो-रो फेरीबोटीमध्ये पर्यटकांकडून शुल्क आकारले जाणार आहे. दुचाकी वाहनांना नाममात्र शुल्क लागू करण्यावर विचार केला जात आहे. रो-रो सेवेद्वारे उत्पन्न वाढवण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.