>> तिसर्या टप्प्यातील खातेवाटप जाहीर
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल तिसर्या टप्प्यातील खातेवाटप केले असून आपल्याकडे गृह, वित्त, खाण, दक्षता, शिक्षण, सर्वसामान्य प्रशासन, कार्मिक या खात्यांसह उद्योग व वन ही खाती कायम ठेवली आहेत. मगो नेते व साबांखा व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना नदी परिवहन व वस्तू संग्रहालय तर गोवा फॉरवर्डचे प्रमुख व नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना पुरातत्त्व वस्तू व दस्तावेज ही अतिरिक्त खाती देण्यात आली आहेत.
तिसर्या टप्प्यातील खाते वाटपावेळी काही मंत्र्यांच्या वाट्याला दोन तर काहींच्या वाट्याला एक खाते आले आहे. यापूर्वी केवळ एकच खाते देण्यात आलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना महिला आणि बाल कल्याण व कारागीर प्रशिक्षण ही खाती देण्यात आली आहेत. तर एकच खाते देण्यात आलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना पशुसंवर्धन व शिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.
गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर यांच्याकडे ग्रामीण विकास, गृह निर्माण या खात्यांबरोबर बंदर खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कारखाने व बाष्पक तर जलस्रोत व मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांना वजन व माप खाते देण्यात आले आहे. पर्यटन, पंचायत खात्याचा पदभार असलेले मगोचे बाबू आजगावकर यांना प्रिंटिंग व स्टेशनरी हे अतिरिक्त खाते देण्यात आले आहे.
अपक्ष आमदार आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना नागरी पुरवठा खाते देण्यात आले आहे. रोहन खंवटे यांना कामगार व रोजगार हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे महसूल व माहिती तंत्रज्ञान ही महत्त्वाची खाती होती.
नगरविकास मंत्री फ्रांसिस डिसोझा यांना प्रोव्हेदोरिया व विधानसभा व्यवहार तर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा खात्याचा ताबा देण्यात आला आहे.