स्टार्टअप ः यशस्वीही आणि अयशस्वीही!

0
2
  • शशांक मो. गुळगुळे

भारतीय तरुण नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’ उभारत असून सरकारनेही ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान राबवून त्याला प्रोत्साहन दिले आहे. अनेक ‘स्टार्टअप’ कंपन्या चांगली कामगिरी करीत आहेत, तर काही मोठा गाजावाजा करून नंतर बंद पडल्याचीही उदाहरणे आहेत.

आपला देश हा ‘स्टार्टअप हब’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालून उभारला जाणारा उद्योग म्हणजे ‘स्टार्टअप’! बुद्धिमान भारतीय तरुण नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’ उभारत असून सरकारनेही ‘स्टार्टअप इंडिया’ अभियान राबवून त्याला प्रोत्साहन दिले आहे. अनेक ‘स्टार्टअप’ कंपन्या चांगली कामगिरी करीत असून, त्या मोठ्या झाल्या आहेत. काही मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या स्टार्टअप कंपन्या मात्र नंतर बंद पडल्याची उदाहरणे आहेत.

पूर्वी नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाला ‘स्टार्टअप’ असे म्हटले जात नसे. आजकाल मात्र प्रत्येक नव्या व्यवसायाला ‘स्टार्टअप’ असे म्हटले जाते. कोविडच्या काळात अनेकांनी स्वतःचे विविध उद्योग-व्यवसाय सुरू केले, त्यांतील अनेक यशस्वी झाले. कोविडनंतर स्टार्टअपचा जोर इतका होता की सरकारनेदेखील त्याची दखल घेतली आणि 2022 पासून 16 जानेवारी हा दिवस भारतात ‘स्टार्टअप दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
भारतातील अनेक स्टार्टअप अल्पावधीतच यशस्वी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर स्टार्टअपच्या भाषेमध्ये ज्याला ‘युनिकॉर्न’ म्हटले जाते अशा आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त कंपन्या भारतात आहेत. युनिकॉर्न म्हणजे एक अब्जपेक्षा जास्त अमेरिकी डॉलर (8500 कोटी रुपये अंदाजे) मूल्य असलेली कंपनी. स्टार्टअपचे यश आणि क्षमता मोजण्याचा हा एक महत्त्वाचा मापदंड आहे. भारतातील ‘युनिकॉर्न’पैकी काही प्रसिद्ध नावे म्हणजे इंडिया-मार्ट, मेक माय ट्रिप, रेझरपे, झोमॅटो, मिंत्रा, झोहो, अर्बन कंपनी, बोट, अनॲकेडमी इत्यादी. या सर्व युनिकॉर्न कंपन्या शैक्षणिक, फिनटेक, कपडे, खाद्यपदार्थ, सेवा अशा विविध क्षेत्रांतील आहेत. जगभरातील युनिकॉर्न स्टार्टअपची वाढती संख्या पाहता आता डेकाकॉर्न (ज्यांचे मूल्य 10 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे अशा कंपन्या) ही संकल्पना वापरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या भारतात बायजू, स्विगी, फ्लिपकार्ट, फोन-पे, नायका या पाच डेकाकॉर्न कंपन्या आहेत. अशा यशस्वी स्टार्टअपचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक सहभाग आणि वाटा आहे. तसेच रोजगारनिर्मिती, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक योगदान व जागतिक बाजारात भारताची पत सुधारणे अशा अनेक प्रकारे या कंपन्या योगदान देतात.

स्टार्टअप अयशस्वी होण्याची कारणे
अ) अनेक स्टार्टअप्‌‍मध्ये संस्थापक अतिशय उत्साहाने सुरुवात करतात. परंतु त्याआधी त्यांना नक्की काय उत्पादित करायचे आहे याचा विचार केलेला नसतो. ब) मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविताना येणाऱ्या संभाव्य अडचणींची कल्पना नसल्याने त्याचा विचार केला जात नाही. वापर करणाऱ्याला काय अपेक्षित असेल किंवा वापरास सोपे जाईल याचाही विचार केला न गेल्याने तयार झालेले प्रॉडक्ट वापरणाऱ्यांना आवडत नाहीत. त्यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वापरणाऱ्यांकडून आलेल्या सूचना व अभिप्रायांकडे दुर्लक्ष केले जाते. क) जी संकल्पना समोर ठेवून ‘प्रॉडक्ट’ तयार असते त्याची भारतीय बाजारात गरज तसेच उपयोग नसतो. ड) उत्पादकाच्या मनातील संकल्पना कळून, त्याला हवे तसे प्रॉडक्ट निर्माण करण्यासाठी सक्षम अशा मनुष्यबळाची गरज असते. अशा सक्षम व्यक्ती न सापडणे, उपलब्ध मनुष्यबळाची संघबांधणी करायला व त्यांना प्रोत्साहित करायला न जमणे, आपापसात वाद होणे अशा अनेक गोष्टींचा परिणाम तयार होणाऱ्या उत्पादनावर होतो. इ) चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी, चुकीच्या किमतीला प्रॉडक्ट विकणे. ई) संकल्पनेवर काम सुरू केल्यानंतर ती प्रत्यक्षात बाजारात आणण्यापर्यंतच्या प्रवासात उत्पादकाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यात वैयक्तिक प्रश्न, आर्थिक अडचणी, जास्त संकल्पनांवर एकाच वेळी काम करणे, प्रॉडक्टबद्दल घेतलेल्या निर्णयात सतत बदल करणे ही कारणेदेखील असू शकतात. कायदेशीर अडथळ्यांमुळेही स्टार्टअप बंद पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. उपलब्ध भांडवलात अनेक खर्च भागवायचे असल्याने अन्य काही खर्च टाळले जातात.

स्टार्टअप सुरू करताना
1) जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचे स्वरूप, त्यात सहभागी व्यक्ती, त्या व्यवसायाच्या वाढीसंदर्भात असलेले ध्येय यांसारख्या गोष्टींचा विचार करून कोणत्या प्रकारचे कायदेशीर स्वरूप अनुरूप ठरेल याचा सुरुवातीलाच विचार व्हायला हवा. सर्वच स्टार्टअपसाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे स्वरूप योग्य ठरत नाही. 2) स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी विविध नियमांचे पालन करावे लागते. अनेक कायदेशीर कागदपत्रांची पूर्ततादेखील करावी लागते. पूर्तता वेळीच न झाल्यास त्याचे होणारे परिणाम दूरगामी असू शकतात. यामुळे आर्थिक दंड स्वरूपाची शिक्षा झाल्यास, अशी दंडाची खूप मोठी रक्कम भरावी लागल्यास आर्थिक ताण येऊ शकतो. 3) अनेकदा स्टार्टअप हे एखाद्या नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित असतात. तसेच त्या संकल्पनेला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा अनोख्या पद्धतीने वापर केलेला असू शकतो. वेगळे तंत्रज्ञान विकसित केलेले असू शकते. उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी वैविध्यपूर्ण जाहिराती केल्या असू शकतात. अशा तऱ्हेने स्टार्टअपच्या बाबतीत पेटंट, कॉपीराईट, व्यापारचिन्ह या एक वा विविध प्रकारच्या बौद्धिक संपदा अतिशय महत्त्वाच्या असू शकतात. आपल्या व्यवसायात कोणत्या प्रकारची बौद्धिक संपदा आहे, ती कशाप्रकारे राखायची, त्यासाठी योग्य वेळ कोणती, कशाची नोंदणी गरजेची आहे, या सर्वांची माहिती सुरुवातीलाच करून घ्यावी. 4) उत्पादन करून ते बाजारात आणण्यापर्यंत कामगार, सल्लागार, सेवा पुरवठादार, कच्च्या मालाचे पुरवठादार आदी अनेक विविधांबरोबर काम करावे लागते. त्यांच्या सेवा वापराव्या लागतात. अशा प्रत्येकाशी योग्य त्या प्रकारचा कायदेशीर करार लेखी स्वरूपात करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे स्टार्टअपचे कायदेशीर हित व हक्क जपले जातात. 5) अनेक स्टार्टअपमध्ये अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे स्टार्टअप सुरू करणाऱ्यांतला करार. एखादा भांडवल आणतो तर कोणाकडे तांत्रिक ज्ञान असते. एखाद्याचे विक्रीकौशल्य किंवा विविध लोकांशी असणारे नातेसंबंध स्टार्टअपच्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात. जेव्हा सर्व ‘प्रमोटर्स’ एकत्रितपणे काम करतात तेव्हा प्रश्न नसतो, पण मतभेद व्हायला सुरुवात झाली की ते विकोपाला जाऊ शकतात. त्यामुळे सर्व ‘प्रमोटर्स’नी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठीची प्रक्रिया, प्रत्येकाचे मालकी हक्क, एखाद्याला बाहेर पडायचे असल्यास त्यासाठीची प्रक्रिया हे सर्व ‘डॉक्युमेन्टेड’ हवे. 6) काही स्टार्टअपच्या ‘प्रमोटर्स’ना पुढे जाऊन व्यवसायात भांडवल घालू शकणाऱ्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या अपेक्षा असतात. कोणतीही गुंतवणूक घेताना गुंतवणूकदाराने दिलेल्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी त्यात लिहिलेल्या अटी-शर्ती, निर्बंध आदी समजून घेणे महत्त्वाचे असते. नाहीतर येणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्टार्टअप हातातून जाऊ शकते. 7) सुरू केलेल्या स्टार्टअपसाठी कोणते कामगार कायदे व अन्य विशेष कायदे लागू होतात याची माहिती असणे व ते पालन करणे महत्त्वाचे असते. 8) सुरू केलेल्या स्टार्टअपद्वारे कोणत्या प्रदेशातील ग्राहकांना सेवा देणार आहोत, त्या प्रदेशातील लागू कायद्यांची माहिती करून घेऊन त्यांची पूर्तता करणे गरजेचे. 9) अनेक स्टार्टअपमध्ये सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांना व सल्लागारांना स्वेट इक्विटी देण्याची तयारी दाखविली जाते. याची पूर्तता वेळेत करावी, नाहीतर हे देताना अडचणी येतात. थोडेसे गांभीर्याने घेतल्यास स्टार्टअप यशस्वी होणे कठीण नाही. सर्व स्टार्टअप यशस्वी होणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहे. यातून ‘नोकरी मागू नका, नोकरी देणारे व्हा’ हा विचार सिद्ध होतो.