आरोग्यक्षेत्रात विमानसेवेसाठी प्रयत्न ः आरोग्यमंत्री

0
2

आरोग्यसेवेसाठी डिचोली तालुका दत्तक घेण्याची घोषणा

देशातील प्रजेची सेवा करण्याची विचारधारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली असून त्यासाठी या छोट्याशा राज्यात आधुनिक सुविधांनीयुक्त आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सामान्य माणसालाही प्रसंगी विमानाने इतर राज्यांत उपचारासाठी नेण्याची सुविधाही उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डिचोली येथे सांगितले. यावेळी आरोग्यमत्री राणे यांनी, 60 नवे वैद्यकीय अधिकारी, 75 नवीन रुग्णवाहिका, डिचोली तालुका दत्तक घेणे तसेच डिचोलीत आधुनिक सुविधा पुरवणे यावर आमचा भर असल्याचे सांगितले.

राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करून आरोग्यसेवा घरोघरी पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येकाचे जीवन आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचा दावा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी केला.
यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ रूपा नाईक आदी उपस्थित होते.

डिचोली, मडकईत ऑपरेशन थिएटर

डिचोली व मडकई येथील ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानामार्फत 212 उपआरोग्य केंद्रात 15 विविध टेस्टिंग सुविधा करणारी मशिनरी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. राज्यातील विविध इस्पितळांची निगा आता गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत निश्चित झाले आहे अशी घोषणाही मंत्री राणे यांनी यावेळी केली.