दोन वाहनांसह चौघेजण ताब्यात
काल रविवारी दुपारी केरी येथील तपासणी नाक्यावर पोलिसांच्या भरारी पथकाने कारवाई करून दोन वाहनांतून सुमारे 500 कि.लो. गोमांस जप्त केले आहे. याची किंमत 2 लाख 75 हजार रुपये असून पोलिसांनी गोमांस व दोन वाहने अशी एकूण 18 लाखांची मालमत्ता जप्त केलेली आहे. तसेच या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.
डिचोली उपधीक्षक जीवबा दळवी व वाळपई पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी याची माहिती देताना, केरी येथील तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी दुपारी अडीचच्या सुमारास हुंदाई कार जीए 03 वाय 7867 व टोयोटा इटियोस जीए 05 बी 9993 या दोन्ही गाड्यांची तपासणी झाली. यावेळी या दोन्ही गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बीफ असल्याचे आढळून आले. या संदर्भाची कायदेशीर कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ज्यावेळी या दोन्ही गाड्या अडविण्यात आल्या त्यावेळी जबरदस्तीने दोन्ही वाहन चालक पळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी शिताफीने दोन्ही गाड्या अडवून ठेवल्या व त्यांची तपासणी केली.
चौघांना अटक
पोलिसांनी या संदर्भात चौकशी करून बेकायदा गोमांस वाहतूक करण्याच्या गुन्ह्याखाली अमानअली हुसेनसाब देसाई (23, झुवारीनगर मुरगाव), सय्यद अमिनसाब मोकाशी (29, मांगुरहील मुरगाव), सोहेल सलीम नाईकवाडी (28, उज्वलनगर बेळगाव) व इरफान असीब बागवान (23, आझादनगर बेळगाव) यांना अटक केली.